"सरकारने महिलांना फक्त पैसे देण्यापेक्षा...", 'लाडकी बहीण योजने'वरुन निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:27 IST2025-01-23T09:27:10+5:302025-01-23T09:27:35+5:30
"लाडकी बहीण सुरू करणाऱ्या भावांचे आभार, पण...", निवेदिता सराफ नेमकं काय म्हणाल्या?

"सरकारने महिलांना फक्त पैसे देण्यापेक्षा...", 'लाडकी बहीण योजने'वरुन निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या
सध्या लाडकी बहीण योजनेवरुन राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. तर काही अपात्र महिलांचे पैसे परत घेण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेवरुन आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवेदिता सराफ यांनी नुकतीच 'तारांगण' या युट्यूब चॅनेला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, "ही योजना नक्कीच चांगली आहे. गरजूंपर्यंत सरकार पोहोचत आहे. ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या सगळ्या भावांचे आभार. पण, मला वाटतं की फक्त पैसे देण्यापेक्षा महिलांना स्वत:च्या पायावर कसं उभं राहता येईल आणि सक्षम कसं बनवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे. माझी आई नेहमी सांगते की कुठलंही दान हे सतपात्री असावं. मग ते दान हे ज्ञान, प्रेम किंवा पैशाचं असेल. त्यामुळे महिलांना सक्षम बनवण्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. नुसते पैसे देऊन प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. कारण, पैसे आले की ते खर्च होऊन जातात. महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं हे जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं".
निवेदिता सराफ या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनयाने त्यांनी ९०चं दशक गाजवलं. आजही त्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आता 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.