"पॅरिसमध्ये एका रात्रीत..." नितीन देसाईंना हत्तींवर होतं प्रचंड प्रेम; वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 11:33 IST2023-08-02T11:29:41+5:302023-08-02T11:33:28+5:30
नितीन देसाई आणि हत्तींचं काय होतं कनेक्शन

"पॅरिसमध्ये एका रात्रीत..." नितीन देसाईंना हत्तींवर होतं प्रचंड प्रेम; वाचा किस्सा
भव्य सेटसाठी प्रसिद्ध असलेले कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आज आत्महत्या केल्याने संपूर्ण कलाविश्व हादरलं आहे. कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. सिनेमांमध्ये भव्यदिव्य सेट उभारण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. 'लगान', 'देवदास', 'परिंदा' सारख्या हिंदी आणि 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमांचं त्यांनी कलादिग्दर्शन केलं.
नितीन देसाई यांना हत्तींबाबत प्रचंड क्रेझ होती. त्यांच्या कित्येक कामांमध्ये हत्तींचा समावेश असायचा. माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, 'गणपती बाप्पा कलेचं आराध्य दैवत. एक सामान्य मुलगा गजराजाच्या शरीर लावल्याने तो महान झाला त्यामुळे हत्तीमध्ये पण महत्व आहे. शिवाय मी भरपूर ऐतिहासिक सिनेमांमध्ये काम केलं. आपण नेहमी म्हणतो अमुक राज्याकडे एवढे हत्ती, तमुक मंदिरात एवढे हत्ती. पॅरिसच्या लील शहरात मी भारताचं प्रतिनिधित्व करत होतो. तिथे पॅरिसच्या रस्त्यावर मी एका २४ फुटांच्या १२ हत्तींची मांडणी केली. N D स्टुडिओत ते हत्ती बनले, फोल्ड झाले, कन्टेनरमधून पॅरिसला पोहोचले. तिथे आम्ही जेव्हा हत्ती उभारले तेव्हा तिथला एक माणूस आश्चर्यचकीत झाला की अरे एका रात्रीत इथे एवढे हत्ती कसे आले.कलेच्या क्षेत्रात वैभव उभं करता करता मला हत्तींची क्रेझ निर्माण झाली.'
दरम्यान नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सिनेसृष्टी हळहळली आहे. नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांनी मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतले. तर 1987 पासून त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 साली आलेल्या अधिकारी ब्रदर्सच्या 'भूकंप' सिनेमातून त्यांनी सुरुवात केली. मात्र 1994 साली आलेल्या '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली.