"मी भाजपाला मत दिलं...", मतदान केल्यानंतर मराठी अभिनेत्याने जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:38 IST2026-01-15T13:36:16+5:302026-01-15T13:38:09+5:30
खरं तर आपण कोणाला मत दिलं हे गुपित ठेवायचं असतं मात्र अभिनेत्याने त्याचं मत कोणाला दिलं हे सोशल मीडियावर जाहीररित्या सांगून टाकलं आहे.

"मी भाजपाला मत दिलं...", मतदान केल्यानंतर मराठी अभिनेत्याने जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल
Municipal Election: आज राज्यात २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. सकाळपासूनच मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. नेते मंडळी, सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मराठी अभिनेत्यानेदेखील त्याचा मतदानाचा हक्क बजावत राज्यातील महानगरपालिका निवडणुकतीच मतदान केलं आहे.
खरं तर आपण कोणाला मत दिलं हे गुपित ठेवायचं असतं मात्र अभिनेत्याने त्याचं मत कोणाला दिलं हे सोशल मीडियावर जाहीररित्या सांगून टाकलं आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अभिनेत्याने त्याचा निळी शाई लावलेला बोटाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने भाजपाला मतदान केल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे. "महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदान करत मी भाजपाला मत दिलं. प्रगतीसाठी हे मत मी दिलं आहे. तुम्ही मतदान केलं का?", असं अभिनेत्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर आहे.
आरोह वेलणकरबरोबरच प्राजक्ता माळी, अक्षय कुमार, नाना पाटेकर, शशांक केतकर, वीणा जामकर, मिलिंद गवळी, सुबोध भावे, चिन्मयी सुमित यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या महापालिकांचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. या २९ महानगरपालिकांसाठी जवळपास ७-८ वर्षांनी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सगळ्यात महत्त्वाची मानली जात असून इथे कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.