महेश यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम का करत नाही? मेधा मांजरेकर म्हणाल्या, "कोणी विचारतच नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 14:18 IST2025-01-26T14:18:11+5:302025-01-26T14:18:40+5:30
मेधा मांजरेकर स्पष्टच बोलल्या

महेश यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम का करत नाही? मेधा मांजरेकर म्हणाल्या, "कोणी विचारतच नाही..."
मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि पत्नी मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) ही लोकप्रिय जोडी. दोघांनी मिळून अनेक सिनेमे केले आहेत. 'काकस्पर्श', 'नटसम्राट', 'जुनं फर्निचर' अशा सिनेमांमध्ये मेधा मांजरेकर यांनी काम केलं आहे. मात्र त्या दरवेळी महेश मांजरेकरांच्याच सिनेमात दिसल्या आहेत. कधी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे तर कधी त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आहे. मेधा मांजरेकर इतरांसोबत सिनेमे का करत नाहीत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'एक राधा एक मीरा' सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मेधा मांजरेकरांना प्रश्न विचारण्यात आला की त्या इतर सिनेमे का करत नाहीत? यावर त्या म्हणाल्या, "एकतर मला बाहेर कोणी विचारतही नाही की काम करणार का. तसंच महेशसोबत एक कम्फर्ट आहे. मी अजून अभिनयाकडे असं प्रोफेशनल म्हणून बघतही नाही. महेश सांगतो तसं चुपचाप करायचं एवढंच मला माहित आहे. मला खरंच अजून कोणी बाहेर विचारलंही नाही. एक-दोन सिनेमे केलेत. त्यातही एक महेशबरोबरच केला. 'बंध नायलॉनचे' आणि 'भाऊबळी' हे दोन सिनेमे केले."
अभिनेता म्हणून महेश मांजरेकर कसे आहेत? यावर मेधा म्हणाल्या, "अतिशय हुशार आहे. एकतर तो स्वत: लिहितो. त्यामुळे स्वत:च्या भूमिकेत त्याला खूप छान सुधारणा करता येतात. तसंच तो अभिनेता म्हणून त्याची क्षमता अजून बाहेर आलेली नाही. त्याने अजून अभिनेता म्हणून सिनेमे करावेत अशी माझीही इच्छा आहे."