"सिनेमा अजून खोलात शिरू शकला असता, पण...", 'आता थांबायचं नाय'विषयी मराठी लेखकाची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:19 IST2025-04-30T14:16:45+5:302025-04-30T14:19:39+5:30
सध्या एकामागोमाग एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

"सिनेमा अजून खोलात शिरू शकला असता, पण...", 'आता थांबायचं नाय'विषयी मराठी लेखकाची पोस्ट
Kshitij Patwardhan Post : सध्या एकामागोमाग एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवनवीन विषयांवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडणार आहे. हा चित्रपट म्हणजे शिवराज वायचळ दिग्दर्शित आता आता थांबायचं नाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१६ मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. नापास कर्मचारी दहावीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वायचळ यांनी रंजकतेने पडद्यावर मांडला आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चर्चेत आहे.
नुकतीच क्षितीज पटवर्धनने त्याच्या इन्स्टाग्रावर अकाउंटवर आता थांबायचं नाय चित्रपटासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्याने दिग्दर्शक शिवराज वायचळचं कौतुक केलंय. या पोस्टमध्ये चित्रपटाबद्दल सांगताना त्याने लिहिलंय की, "शिवराज, आपल्या आजूबाजूलाच असलेल्या पण आपण कधीच लक्ष न दिलेल्या माणसांची सुंदर गोष्ट पडद्यावर आणलीस यासाठी तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे! कचराही वेगवेगळा करू न शकणारा पण माणसांना झटक्यात वेगवेगळं करणारा समाज आपण रोज अनुभवतो. पण त्याच्यावर कधी चित्रकाराच्या हलक्या हातानं तर कधी मजुराच्या कणखर दणक्यानं इतकं प्रभावी भाष्य केलंस याचा आनंद आहे. पेपरातल्या छोट्या वाटणाऱ्या कात्रणात अनेकांच्या जगण्याची भलीमोठी पुस्तकं दडलेली असतात, याचा प्रत्यय या सिनेमात आल्यावाचून राहत नाही. त्यासाठी विशेष अभिनंदन.
त्यानंतर क्षितजने लिहिलंय, "प्रभावी कथा, भिडणारे संवाद, (शिवराज, ओंकार, आणि अरविंद जगताप) सगळ्याच कलाकारांचा कसदार अभिनय (भरत जाधव लाजवाब! सिद्धार्थ जाधव अप्रतिम! प्राजक्ता, किरण, आशुतोष सर, पर्ण, ओम, प्रवीण, दीपक शिर्के, सागरचं काम केलेला अभिनेता) जबरदस्त शीर्षक गीत आणि मन आणि डोळे भरून टाकणारा शेवट, ह्या सगळ्या जमेच्या बाजू!सिनेमा अजून खोलात शिरू शकला असता असं वाटलं पण उघड्या ड्रेनेजकडे फक्त डोकावून पाहणाऱ्या माझ्यासारखा माणसांनां आत एक माणूस असू शकतो आणि त्याला आयुष्य असू शकतं, स्वप्न असू शकतात, इतकी जाणीव करून दिलीस तीही काही कमी नाही.तुषार, झी स्टुडिओज आणि बवेश सर, नव्या जाणिवा, नवे आवाज, नवे विचार यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. नव्या दमाच्या दिग्दर्शक लेखक यांच्यासाठी ही गोष्ट आश्वासक आहे.उद्यापासून सिनेमा प्रदर्शित होतोय, नक्की बघा!शिवराज, खूप प्रेम आणि प्रचंड अभिमान!" अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे.
दरम्यान, 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.