"विश्वास ठेवा, नाराज नाही करणार...", 'झापुक झुपूक' सिनेमाबद्दल केदार शिंदेंनी शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:19 IST2025-04-23T16:17:49+5:302025-04-23T16:19:07+5:30
'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंनी शेअर केलेल्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले- "एक नवा प्रवास..."

"विश्वास ठेवा, नाराज नाही करणार...", 'झापुक झुपूक' सिनेमाबद्दल केदार शिंदेंनी शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष
Kedar Shinde: केदार शिंदे (Kedar Shinde) हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे तसेच महाराष्ट्र शाहीर यांसारखे दर्जेदार चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. सध्या मनोरंजन विश्वात झापुक झुपूक चित्रपटामुळे ते चर्चेत आले आहेत. या चित्रपटात बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. येत्या २५ एप्रिलच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचनिमित्ताने सोशल मीडियावर केदार शिंदेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
नुकताच केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रावर अकाउंटवर एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला खास कॅप्शन देत त्यांनी लिहिलंय, "आजपासून माझ्यासाठी नवा प्रवास सुरु होतोय. बुक माय शोवर तिकीट विक्री सुरु होतेय. कालपर्यंत मी जे काही केलं, त्याला तुम्ही भरभरुन प्रेम दिलंय...., यावेळी पुन्हा विश्वास ठेवा, नाराज नाही करणार. वचन देतो. श्री स्वामी समर्थ...!" केदार शिंदेंच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार तसेच त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर, प्रार्थना बेहरे आणि उत्कर्ष शिंदे या कलाकारांनी पोस्टवर कमेंट्स करत 'झापुक झुपूक'साठी केदार शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मराठी मातीतल्या सूरज चव्हाणला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे.