"मला दुपारी १२.५६ वाजता मेसेज आला अन्...", सतीश शाहांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर हळहळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 14:14 IST2025-10-26T14:10:05+5:302025-10-26T14:14:18+5:30
"पत्नी मधुसाठी त्याला जगायचं होतं…", सतीश शाह यांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर भावुक, जुन्या आठवणींना दिला उजाळा

"मला दुपारी १२.५६ वाजता मेसेज आला अन्...", सतीश शाहांच्या निधनानंतर सचिन पिळगांवकर हळहळले
Sachin Pilgaonkar Talk About Satish Shah: गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं काल २५ ऑक्टोबर रोजी निधन झालं.अखेरच्या काळात ते किडनी विकाराने ग्रस्त होते. 18 ऑक्टोबरला त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना सतीश शहा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री सचिन पिळगांवकर यांनी भावुक प्रतिक्रिया आहे.
सतीश शाह यांची कारकीर्द केवळ हिंदी चित्रपटांपुरती मर्यादित नव्हती. "देख भाई देख" आणि "साराभाई vs साराभाई" सारख्या टेलिव्हिजन कार्यक्रमांसह अनेक मालिकांमध्ये देखील ते दिसले. त्यांनी हिंदीसह मराठीतील वाजवा रे वाजवा या चित्रपटात साकारलेला बाबूलाल जैन आजही मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्याचबरोबर "गंमत जंमत" हा चित्रपट करताना त्यांची भेट सचिन पिळगावकरांशी झाली. या चित्रपटानंतर सचिन पिळगांवकर आणि सतीश शहा यांच्यात मैत्रीपू्र्ण संबंध निर्माण झाले. सतीश शहा यांच्या निधनानंतर नुकतीच सचिन यांनी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
न्यूज १८ सोबत बोलताना सचिन पिळगावकर यांनी शाह यांच्याशी असलेल्या त्यांच्या खोल नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. त्यावेळी ते म्हणाले,"गंमत जंमत' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. आम्हाला एकत्र येण्यासाठी एक कारण पुरेसं होतं.1987 चा हा चित्रपटामुळे तो योग जुळून आला. त्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही, पण तिथेच आमची चांगली मैत्री झाली. सतीश त्यांची पत्नी मधु आणि सुप्रिया आम्ही आमच्यात चांगली मैत्री झाली. 'गंमत जंमत'नंतर सतीश आणि मी कधीही एकत्र काम केले नाही, पण त्याचा आमच्या मैत्रीवर परिणाम झाला नाही."
त्यानंतर पुढे ते म्हणाले, "सतीश आणि मधू नेहमीच खूप प्रेमळ होते. आम्ही त्यांना आमच्या चित्रपटांच्या सर्व प्रीमियरमध्ये नेहमीच आमंत्रित करायचो. ते स्क्रीनिंग आणि पार्ट्यांमध्ये यायचे. त्याचं नाव नेहमी आमच्या पाहुण्यांच्या यादीत पहिल्या स्थानवर असायचं. आम्ही त्यांच्याशिवाय कधीच काही साजरे केलं नाही. दुर्दैवाने, मधुचीही तब्येत ठीक नाही. तिला अल्झायमर आहे. या वर्षी सतीशने किडनी ट्रान्सप्लॅंट करुन घेतले होते, त्याला त्याचे आयुष्य वाढवायचे होते जेणेकरून मधुची काळजी घेता येईल. तो डायलिसिसवर होता. त्याची यापूर्वी बायपास सर्जरी झाली होती, जी यशस्वी झाली होती."
सुप्रिया यांनी घेतलेली भेट
"सुप्रिया तीन दिवसांपूर्वीच सतीश आणि मधू यांना भेटायला गेली होती. कामात व्यस्त असल्यामुळे मला जाता आलं नाही. त्यावेळी त्याने कोणते तरी संगीत ऐकवले आणि सुप्रिया-मधू त्यावर नाचल्या होत्या. मधूला त्यावेळी आठवले होते की, ती चा चा चा वर कशी नाचायची. सतीश आणि मी एकमेकांना नेहमी मेसेज करायचो. खरंतर, मला आज दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला, याचा अर्थ तो त्यावेळीही पूर्णपणे ठीक होता. मला धक्का बसला आहे. आपल्याला माहित नसतं की आज आपल्यासोबत काय घडणार आहे. तुम्ही काही भाकीत करू शकत नाही. स्वत आनंदी राहणं आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना आनंदी ठेवा, हेच त्याने देखील केलं. "