"या गोष्टी खूप भयंकर", सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापरावर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणते- "खूप घाणेरड्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:57 IST2025-03-07T16:52:31+5:302025-03-07T16:57:29+5:30
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी होऊन अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली.

"या गोष्टी खूप भयंकर", सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापरावर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणते- "खूप घाणेरड्या..."
Mira Jagannath: 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी होऊन अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Mira jagannath) घराघरात पोहोचली. या कार्यक्रमाने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. 'बिग बॉस' च्या घरात मीराने आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अलिकडेच अभिनेत्री 'इलू इलू' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. मीरा जगन्नाथ तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडियाविषयी वक्तव्य केलं आहे.
मीरा जगन्नाथने सुमन म्युझिक पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मीराकडून एक मागणं जर असेल तर ते काय असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना म्हणाली, "मला खरंच त्यांना सांगावसं वाटतं की, आपल्याकडे काही वेबसाईट्स चालवल्या जातात त्या खूप घाणेरड्या असतात. ज्याच्यावर बऱ्याच अभिनेत्रींचे फोटो, व्हिडीओज तसेच एखाद्या चित्रपटातील सीन त्याच्यावरती घाण भाषेमध्ये काहीतरी लिहिलं जातं. चित्रपट रिलीज करताना तुम्ही त्यावर सेन्सॉर टाकता तर या गोष्टींवरसुद्धा सेन्सॉर टाका."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "कुठल्याही साईट्सवर कोणत्याही परवानगीशिवाय असे व्हिडीओ शेअर केले जातात. शिवाय त्याच्यावरती घाणेरड्या कमेंट्स केलेल्या असतात. मला माझ्या एका फ्रेंडने व्हिडीओचा स्क्रीनशॉट पाठवला होता. त्या व्हिडीओवरील कमेंट्स वाचून मला धक्काच बसला. तो फोटो पाहून मी विचार केला, अरे! हा तर वेब सीरिजचा सीन आहे. हा याच्यावर का आहे? पण त्या फोटोंवर जे काही एआय प्रकार केले जातात, त्या गोष्टी खूप भयंकर आहेत. म्हणजे इन्स्टाग्रामपेक्षा शंभर पटीने यावर कमेंट्स केल्या जातात. हे बंद व्हायला पाहिजे."
वर्कफ्रंट
अभिनेत्री मीरा जगन्नाथने 'माझ्या नवऱ्याची बायको','ठरलं तर मग', अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. त्याचबरोबर बऱ्याच चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.