Video: साखरपुड्यात अंगठी घालताना उडाला गोंधळ, शिवानीने विचारलं... पाहा काय झाली गंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:28 IST2024-02-01T13:27:56+5:302024-02-01T13:28:34+5:30
शिवानी आणि अजिंक्यच्या साखरपुड्याचा हा मजेशीर व्हिडिओ पाहिलात का?

Video: साखरपुड्यात अंगठी घालताना उडाला गोंधळ, शिवानीने विचारलं... पाहा काय झाली गंमत
अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware)लवकरच आयुष्यभराचे सोबती होणार आहेत. कालच दोघांचा साखरपुडा अगदी थाटात पार पडला. तर आजपासून दोघांच्या लग्नापूर्वीच्या फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. अनेक मराठी कलाकार, बिग बॉसचे स्पर्धक शिवानीसोबत धमाल करताना दिसत आहेत. दरम्यान शिवानी आणि अजिंक्यच्या साखरपुड्याचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. अंगठी कोणत्या हातातील बोटात घालायची हेच माहित नसल्याने आधी दोघंही गोंधळलेले दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
शिवानी सुर्वे आणि अजिंक्य चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ही रोमँटिक जोडी चाहत्यांच्याही अत्यंत लाडकीची आहे. दोघांच्या एकत्रित व्हॅकेशनचे फोटो तर कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या वर्षभरापासून शिवानी आणि अजिंक्य एकत्रही राहत आहेत. आता दोघंही नात्यात एक पाऊल पुढे टाकत असून लवकरच लग्नबंधनात अडकत आहेत. शिवानी आणि अजिंक्यने काल जवळच्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. यावेळी शिवानी जांभळ्या रंगाच्या साडीत सुरेख दिसत होती. तर अजिंक्यही नेहमीप्रमाणे अतिशय हँडसम दिसत होता. दरम्यान जेव्हा एकमेकांना अंगठी घालायची वेळ आली तेव्हा दोघंही गोंधळले.आधी शिवानीने अजिंक्या उजव्या हातातील बोटात अंगठी घातली. नंतर जेव्हा अजिंक्य शिवानीला अंगठी घालणार तेव्हाच नेमकी कोणत्या हातात घालायची हेच त्यांना कळलं नाही. शिवानीने विचारलं, 'कोणत्या हातात..?' मग कोणीतरी तिला सांगितलं की डाव्या हातात आणि मग अजिंक्यने तिच्या डाव्या हातातील बोटात अंगठी घातली. अशा प्रकारे त्यांची रिंग सेरेमनी पार पडली.
सध्या या नवीन जोडप्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लवकरच दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख अजून समोर आलेली नाही. मात्र शिवानीला वधू आणि अजिंक्यला वराच्या वेषात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
शिवानीने नुकतेच 'वाळवी','झिम्मा 2' असे बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तर यापुढेही ती काही सिनेमांमध्ये दिसणार आहे. तर अजिंक्य टीव्हीवर सध्या गाजत असलेली मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.