"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

By देवेंद्र जाधव | Updated: February 20, 2025 19:36 IST2025-02-20T19:34:55+5:302025-02-20T19:36:06+5:30

मकरंद अनासपुरे सहकुटुंब 'छावा' पाहायला गेले असता त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे (makrand anaspure, chhaava)

marathi actor makrand anaspure watch chhaava and give his reaction vicky kaushal | "जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे (makrand anaspure) सहकुटुंब 'छावा' (chhaava) सिनेमा पाहायला गेले असता त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीदिनाच्या सर्व मावळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज योगायोगाने याच दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा हा सिनेमा पाहण्यासाठी मी इथे आलोय. मुद्दाम मुलांना घेऊन मी इथे आलोय."

"अलीकडच्या काळात इंग्रजी शाळांचं सगळीकडे पेव फुटलेलं असताना आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या मातीविषयी, आपल्या वीरांविषयी सगळ्यांना माहिती असणार. महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की, आपापल्या मुलांना घेऊन हा सिनेमा दाखवावा. मी अलीकडच्या काळात खूप वेगवेगळ्या बातम्या ऐकतोय. काही हिंदी भाषिक मित्रांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्या की, आमच्या शाळेमध्ये आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा हा इतिहास का शिकवला गेला नाही"

"मला वाटतं की, सध्याच्या काळात समाजामध्ये जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट खूप महत्वाची भूमिका बजावेल, याची मला खात्री आहे. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही करुन ठेवलंय त्याचं काय करायचंय हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अत्यंत सजगतेने, संवेदनशीलतेने हा चित्रपट पाहणं, इतिहास समजून घेणं. इतिहासाची मोडतोड न करता, विकृतीकरण न करता, त्याविषयी विचित्र भाष्य न करता सर्वांचा अभिमान ठेवावा."

"धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच्या धर्मासाठी प्राण त्यागले. त्यांचा धगधगता इतिहास या चित्रपटाने मांडलाय त्याबद्दल मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. प्रमुख भूमिका विकी कौशल यांनी साकारलेली आहे. विकी कौशल आणि त्यांच्याबरोबरचे अक्षय खन्ना असतील, रश्मिका मंदाना असतील आणि त्याच्याबरोबरीने आमच्या मराठीतील सर्व मातब्बर मंडळी ज्यांनी या सिनेमात काम केलंय त्यांचंही अभिनंदन करतो. मला असं वाटतं की, सध्या महाराष्ट्रामध्ये जातीय वातावरण कलुषित करण्याचं काम होतंय, त्यावर हा सिनेमा उत्तम मलम लावण्याचं काम करेन याची मला खात्री आहे."

"आपण सर्वांनी आपला इतिहास अत्यंत प्रेमाने आणि स्वाभिमानाने जपला पाहिजे. आपल्या मुलांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास तितक्याच रोखठोकपणे नेला पाहिजे. मला मध्यंतरी, कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींनी केलेली सूचना फार महत्वाची वाटली की, महाराष्ट्रातील तमाम मातब्बर इतिहासाचे अभ्यासक, त्यांनी सर्वांनी अभ्यासपूर्ण एक शिवचरित्र लिहावं आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावं. जेणेकरुन खऱ्या इतिहासाची मोडतोड करण्याची किंवा त्याविषयी हलक्या दर्जाची विधानं करण्याची सवय मोडीत निघेल." 

"छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा पाहताना मी बऱ्याच प्रेक्षकांच्या विशेषतः लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहतोय. त्यांना ज्या पद्धतीने गहिवरुन येतंय,  ढसाढसा रडताना मुलं पाहिली आणि मला खूप बरं वाटलं की, हा इतिहास जाज्वल्यपणे आपल्या सर्वांसमोर येतोय. सिनेमा म्हणून याचं काही मोल असेल, जो काही व्यवसाय असेल तो महत्वाचा नाहीये. यानिमित्ताने आपण सर्व एकत्र येणं ही या काळाची गरज आहे."

 

Web Title: marathi actor makrand anaspure watch chhaava and give his reaction vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.