'मला चित्रपटासाठी विचारा'; हेमंत ढोमे करतोय दिग्दर्शकांना विनंती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 13:44 IST2023-04-14T13:43:39+5:302023-04-14T13:44:16+5:30
Hemant dhome: गेल्या काही काळापासून हेमंत कोणत्याही चित्रपटात झळकलेला नाही. त्यामुळे चित्रपटात न दिसण्याचं कारण त्याने सांगितलं आहे.

'मला चित्रपटासाठी विचारा'; हेमंत ढोमे करतोय दिग्दर्शकांना विनंती?
उत्तम अभिनेता ते यशस्वी दिग्दर्शक असा प्रवास करणारा मराठीमोळा सेलिब्रिटी म्हणजे हेमंत ढोमे (Hemant Dhome). आपल्या हसतमुख स्वभावामुळे प्रेक्षकांना आपलंस करणारा हेमंत आज मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. अलिकडेच त्याचा झिम्मा हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून हेमंत कोणत्याही चित्रपटात झळकलेला नाही. त्यामुळे चित्रपटात न दिसण्याचं कारण त्याने एका मुलाखतीत दिलं आहे.
अलिकडेच हेमंतने एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने दिग्दर्शकीय क्षेत्रात आल्यामुळे अभिनेता म्हणून मागे पडल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर कोणत्या तरी दिग्दर्शक मित्राने मला चित्रपटात काम द्यावं असंही त्याने गंमतीने म्हटलं. 'दिग्दर्शनात रमल्यापासून अभिनेता हेमंत थोडा बॅकसीटला गेला आहे का?' असा प्रश्न हेमंतला विचारण्यात आला. त्यावर त्याने हो. मी अभिनेता म्हणून बॅकसीटवर गेल्याचं म्हटलं.
"माझ्याकडे पाहूनच सध्या हे लक्षात येत असेल की मी अभिनेता म्हणून स्वत:ला किती बॅकसीटवर टाकलं आहे. गेल्या काही काळात माझे 'झिम्मा', 'सनी', 'सातारचा सलमान' हे लागोपाठ चित्रपट येत गेले. त्यामुळे माझ्यातल्या अभिनेत्याकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे या निमित्तानं मी माझ्या दिग्दर्शक मित्रांना विनंती करीन, की मला फोन करा, एखाद्या चित्रपटासाठी विचारा, मी वजन कमी करीन आणि मग आपण काम करू", असं हेमंत ढोमे म्हणाला.
दरम्यान, हेमंत ढोमे याने मराठी सिनेमांसह नाटकांमध्येही काम केलं आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्याने अभिनयापासून फारकत घेतली आहे. तो सिनेमाच्या दिग्दर्शनात जास्त रमतांना दिसत आहे.