"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:54 IST2025-10-28T12:53:20+5:302025-10-28T12:54:07+5:30
महेश मांजरेकरांनी सिने क्षेत्राविषयी मांडलं मत, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर सध्या चर्चेत आहे. त्यांचा गाजलेला 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या २००९ सालच्या सिनेमाचा भाग २ येत आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय' असं सिनेमाचं शीर्षक आहे. हा सिनेमा शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित आहे. सिनेमाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल असं भाकीत केलं. एआय सगळ्याची जागा घेणार असं ते म्हणाले.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, "हिरोची हिरोगिरी आता कमी झाली आहे. कंटेंटच आता सगळं काही आहे. माझं मत आहे की दीड वर्षांनंतर सिनेमा बंद होईल. एआय ने आता एवढं टेकओव्हर केलंय...युट्यूबवर तुम्ही ते जे ट्रेलर बघाल तर ते जे व्हिज्युअल दिसतं ते कॅमेऱ्यात कॅप्चर करणं शक्यच नाही. तुम्ही कितीही चांगले व्हीएफएक्स केले तरी तसे बनू शकत नाहीत. मी सहा महिन्यांपूर्वी बघितलेलं एआय आणि आताचं एआय यात जमीन आसमानाचा फरक आहे. ज्या दिवशी ते कोड क्रॅक करतील तेव्हा आम्ही सगळे संपू. मी महाभारताचा ट्रेलर पाहिला तो डोळे दिपवणारा होता. त्यातही हवं ते ३डी, ४डी पर्याय होते. मग का लोकं कलाकारांना पाहायला पैसे देतील. पण खरोखर एआय हे धोकादायक आहे. सिनेमा बनवतानाची आधीची प्रक्रिया मॅन्युअल होती पण आज त्यात केवढा बदल आहे. तेव्हाही लोक नाही असं होणार नाही म्हणाले होते पण बदल घडलाच ना?"
ते पुढे म्हणाले, "रोज १० हजार सिनेमे बनतील. बनवायला काही खर्चही नाही. माझा एक मित्र त्याला मी विचारलं की शूट नसताना काय करतोय तर म्हणाला मी अॅड फिल्म बनवतो. त्याने मला दाखवलं तेव्हा मी म्हणालो मस्त आहे. त्याला त्याचे ५० हजार मिळाले पण त्याला एआयवर करायला फक्त २ हजार खर्च आला. त्यामुळे एंटरटेन्मेंटने आतापासून थिएटरकडे वळावं. कारण सिनेमा आता दीड वर्षात बंद होईल हे माझं भाकीत आहे. कारण एआय दहा पटीने चांगलं देणार आहे."