"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:29 IST2025-10-25T09:27:44+5:302025-10-25T09:29:50+5:30
महेश मांजरेकरांनी सलमान खानसोबत पुढे चित्रपट करणार नाही असं मोठं विधान केलं. याशिवाय 'अंतिम'च्या सेटवर काय घडलं याचाही खुलासा केला

"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक. महेश मांजरेकर यांनी आजवर विविध हिंदी - मराठी सिनेमांच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. इतकंच नव्हे, त्यांनी मराठीसोबत बॉलिवूडमध्येही अभिनयाचा डंका वाजवला आहे. महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची चांगली मैत्री आहे. पण अशातच नुकत्याच एका मुलाखतीत महेश यांनी सलमानसोबत चित्रपट करणार नाही, असं स्पष्ट विधान केलंय. काय म्हणाले?
महेश मांजरेकरांचं सलमानविषयी मोठं विधान
महेश मांजरेकर यांनी माझा कट्टाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. ''मी सलमान खानचा अंतिम नावाचा पिक्चर केला. मग तुम्ही मला विचाराल की, सलमान खानचा दुसरा चित्रपट करशील का? मी म्हणणार नाही. सलमानला वाटतं, त्याला सिनेमा कळतो. त्याचे वडील मेकर आहेत. पण मी थोडासा हेड स्ट्राँग आहे. त्याच्यासाठीच तो तीन वाजता आला ना, तेव्हा मी त्याच्यावर चिडलेलो. तुम्ही मला शिवी दिली, असं सलमान मला म्हणाला. मी त्याला म्हटलं, सलमान मी तुला शिव्या देत नाहीये. तुझ्यामध्ये जो दिग्दर्शक लपला आहे ना, त्याला शिव्या देतोय. तू आता दिग्दर्शक म्हणून पिक्चर मला दिलायस ना, मग इतर गोष्टी विसर.''
अशाप्रकारे महेश यांनी हा मोठा खुलासा केला. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंतिम' सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलं होतं. या सिनेमात सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत होता. मराठीतील सुपरहिट सिनेमा 'मुळशी पॅटर्न'चा हा हिंदी रिमेक होता. परंतु 'मुळशी पॅटर्न'ला जसा प्रतिसाद मिळाला तसं यश 'अंतिम'च्या वाट्याला आलं नाही. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान सध्या महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय' या नवीन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ३१ ऑक्टोबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.