"वाईट काळात प्राजक्ता माळीने...", क्रांती रेडकरचा खुलासा; विक्रम गोखले, सुबोध भावेचंही घेतलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:50 IST2025-12-11T16:49:10+5:302025-12-11T16:50:04+5:30
हे लोक असे आहेत ज्यांनी मला..., क्रांती रेडकर काय म्हणाली?

"वाईट काळात प्राजक्ता माळीने...", क्रांती रेडकरचा खुलासा; विक्रम गोखले, सुबोध भावेचंही घेतलं नाव
अभिनेत्री क्रांती रेडकर आणि पती समीर वानखेडे मधल्या काळात चर्चेत होते. समीर वानखेडे एनसीबीचे प्रमुख असताना त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्सप्रकरणी अटक केली होती. नंतर काही महिन्यांनी समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप झाला. नंतर त्यांच्या जातीवरूनही प्रश्न उपस्थिती झाले होते. त्यावेळी क्रांती नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभी होती. पत्रकार परिषद घेऊन ती सर्व आरोपांना सडेतोड उत्तरं देत होती. तिच्या या कठीण काळात इंडस्ट्रीमधील कोणत्या कलाकारांनी तिची साथ दिली याचा खुलासा क्रांतीने नुकताच केला आहे.
'इसापनीती'ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकर म्हणाली, "खरंतर या काळात कोणीही सपोर्ट करत नाही. पण मला आवर्जुन इंडस्ट्रीतली काही नावं घ्यावी वाटतात जी माझ्या बाजूला खंबीरपणे उभी होती. विक्रम गोखले...जे आपल्यात आता नाहीत. त्यांचा मला दर दोन दिवसांनी फोन यायचा. 'बेटा, मी आहे हा...' असं ते मला म्हणायचे. ते भलेही माझ्यापासून लांब होते. पण दर दोन दिवसाला फोन करणं, मी आहे, तू चांगलं लढतेय तू लढ, मध्यरात्रीही वाटलं तर फोन कर असं म्हणत त्यांनी मला मानसिक आधार दिला. त्या माणसाबरोबर मी एक सिनेमा केलेला. आमचं खूप वर्षांचं बाँडिंग आहे असंही नव्हतं. पण त्यांना आमची तळमळ दिसत होती."
"सुबोध भावे-मंजिरी त्यांनी मला एकदा फोन केला होता. ते मला म्हणालेले की, 'क्रांती, तू कमाल लढतीयेस. मला माहितीये तुझी मुलं लहान आहेत. कधीही तुला असं वाटलं ना की मुलांकडे बघायला कोणीतरी हवंय आणि तू या सगळ्यात व्यग्र आहेस तर आम्ही इथे आहोत. तुला कधीही वाटलं तर मुलींना आमच्याकडे बिंधास्त सोड आणि जा, लढ. हे बोलणं खूप महत्वाचं असतं. अशी काही लोकं मी मोजू शकते. विक्रम गोखले, सुबोध भावे आणि बायको, प्राजक्ता माळी, बिजय आनंद आणि मेघा धाडे ही पाच नावं मला आठवतात जी माझ्याबाजूने होती. बाकी सगळे किरकोळ विचारपूस करणारे होतेच पण एक जबाबदारी दाखवणारी, आम्ही आहोत असं म्हणणारी ही पाच-सहा लोकं होती."