अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:12 IST2025-07-24T10:11:28+5:302025-07-24T10:12:08+5:30
इटालियन तरुणींनी खास लावणी गायली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणींचं नागपूरसोबत खास नातं असल्याचं समजतंय

अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
सध्या हिंदी-मराठी भाषेचा वाद सुरु आहे. मराठी इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या वादावर व्यक्त झाले. आजही आसपास याविषयी वातावरण तापलं असताना सर्वांना एक सुखद धक्का मिळालाय. इटालियन तरुणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या तरुणींनी 'वाजले की बारा' ही गाजलेली मराठी लावणी गायली आहे. ताल-सुराच्या साथीने या तीन तरुणींनी खास अंदाजात ही लावणी गायली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमागे नागपूरचं खास कनेक्शन समोर आलं आहे.
इटालियन महिलांचा लावणीवर ठेका
इटलीतील एका समुद्रकिनाऱ्यावर काही इटालियन महिलांनी अस्खलित मराठीत "आता वाजले की बारा" ही लावणी गायली आहे, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामागचं नागपूर कनेक्शन असं आहे की, नागपूरचे मूळ रहिवासी आणि सध्या इटलीत वास्तव्यास असलेले योगगुरू माही गुरूजी यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. माही गुरूजी इटलीत योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून, जगभर योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा त्यांची इच्छा आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलं होतं. विशेष म्हणजे, माही गुरूजी इटलीतील मराठीप्रेमींना मराठी भाषेचे धडेही देतात.
या व्हायरल व्हिडीओने मराठी संस्कृतीचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवला आहे. इटालियन महिलांनी मराठी लावणी गाताना दाखवलेला उत्साह पाहून प्रत्येक मराठी मन अभिमानाने उंचावलं आहे. फक्त मराठीच नाही तर इतरांनीही या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केलाय. याशिवाय माही गुरुजींच्या कार्याचा गौरव केला आहे. मराठी भाषेचा हा गोडवा इटलीपर्यंत पोहोचल्याने "मराठीचा डंका जागतिक पातळीवर वाजतोय" असं म्हणायला हरकत नाही!