"हा वर्ल्डकप फक्त त्यांनी जिंकला नाहीतर...", सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत! पुरुषप्रधान संस्कृतीवर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:04 IST2025-11-03T15:59:54+5:302025-11-03T16:04:46+5:30
icc womens world cup 2025: महिला क्रिकेट वर्ल्डकप संदर्भात सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाले...

"हा वर्ल्डकप फक्त त्यांनी जिंकला नाहीतर...", सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत! पुरुषप्रधान संस्कृतीवर म्हणाले...
Womens World Cup 2025: काल भारतीय महिला क्रिकेटपटूंनी ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इतिहास रचला. हरमन प्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला क्रिकेट टीमने डॉ. डी.वाय पाटील स्टेडिअमवर द. आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरून देशवासियांच्या इच्छा पूर्ण केल्या. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात टीम इंडियानं महिला क्रिकेटमधील ताकदवान ऑस्ट्रेलियाच्या संघाला नमवत विजेतेपदाचा कळस चढवला. भारताच्या या लेकींच्या कामगिरीनंतर संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
महिला क्रिकेट संघाच्या या अभूतपूर्व कामगिरीनंतर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळी देखील सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त करत आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनी भारताच्या महिला क्रिकेट संघासाठी कौतुकोद्गार काढत खास व्हिडीओ शेअर केला आहे. सलील कुलकर्णींचं क्रिकेटप्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता त्यांनी महिला खेळांडूंच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर आपल्या भावना व्यक्त करत म्हटलंय, "नमस्कार मित्रांनो , आज भारताच्या महिला संघानं वर्ल्ड कप जिंकला. पण तो फक्त त्यांनी जिंकला नाहीये तर तो आपण सगळ्यांनी जिंकलाय. हा ड्रेस त्यांच्यासाठी आहे. हा वर्ल्ड कप फक्त आताच्या या १५ मुलींनी जिंकला नाहीये. ज्यांनी महिला क्रिकेट हट्टानं सुरू केलंय, योगायोगानं यातल्या अनेक जणांशी बोलण्याचा योग आला. या घरात सांगू पण शकायच्या नाहीत की क्रिकेट खेळतोय. पेपरात जर मॅन ऑफ द मॅचचं नाव आलं तर देऊ नका असं सांगायला लागायचं."
पुढे ते म्हणाले,"महिला क्रिकेट सुरू झालं ७० च्या दशकात. तेव्हापासूनच्या ज्या आपल्या कर्णधार होत्या. फक्त भारताच्या नाही तर, प्रत्येक राज्याच्या, प्रत्येक शहराच्या. त्या प्रत्येकीनं आज वर्ल्ड कप जिंकलाय. शांता रंगास्वामी, शुभांगी कुलकर्णी,अंजुम चोप्रा, मिताली राज या सगळ्यांनी आज वर्ल्ड कप जिंकला. कारण ही सीस्टिम मोडून त्या सगळ्या आल्या. ही आजची मॅच आपण साऊथ आफ्रिकेविरुद्ध जिंकली असली तरी, हा वर्ल्ड कप त्यांनी व्यवस्थेविरोधातही जिंकला. एक क्रिकेट खेळणाऱ्या मुलीचा बाप, निरीक्षक म्हणून मी हे सांगतो आहे. खूप सुक्ष्म, सुक्ष्म अडचणी असतात. आज जेव्हा डी. वाय पाटील फुलहाऊस होतं. लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते. त्यांची मॅच बघायला सचिन तेंडुलकर, जय शहा अनेक जुने क्रिकेटर्स होते. तेव्हा असं वाटलं
त्या व्यवस्थेविरोधात पुरुषप्रधान संस्कृतीचं ते झुल होतं मानेवर ते झुगारून त्यांनी वर्ल्डकप जिंकला. "
देवानंही त्यांचं स्वप्न देखील पूर्ण केलं...
"तर अमोल मुझुमदार हे आमच्या जनरेशनचे आहेत, आम्ही कॉलेजमध्ये असताना त्यांचं नाव सतत पेपरमध्ये यायचं. याचं शकत , यांचं द्विशतक . तरी भारताच्या टीममध्ये त्यांना संधी मिळाली नाही. पण आज मला वाटतं की, देवानंही त्यांचं स्वप्न देखील पूर्ण केलं." असं म्हणत त्यांनी महिला क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या व्हिडीओमध्ये प्रत्येक क्रिकेटरचं कौतुक करत पुढे त्या टेस्ट मॅचमध्ये ही चांगली कामगिरी करतील अशी आशा व्यक्त केली आहे.