लेक असावा तर असा; वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने फेडलं वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 16:40 IST2023-06-18T16:37:14+5:302023-06-18T16:40:12+5:30
Gashmeer mahajani: रविंद्र महाजनी यांची एका व्यवसायात मोठी फसवणूक झाली. परिणामी, ते कर्जाच्या डोंगराखाली सापडले.

लेक असावा तर असा; वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने फेडलं वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज
मराठी कलाविश्वातील हॅण्डसम हंक म्हणजे गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani). हिंदीसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या गश्मीरने त्याच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यातच गश्मीरदेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतो. अनेकदा तो त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमधील काही क्षणही चाहत्यांसोबत शेअर करतो. परंतु, सध्या गश्मीर त्याच्या वडिलांमुळे म्हणजेच रविंद्र महाजनी यांच्यामुळे चर्चेत येत आहे.
मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी. ज्याप्रमाणे सध्या गश्मीर सिनेसृष्टी गाजवत आहे. तसाच एक काळ रविंद्र महाजनी यांनी गाजवला होता. त्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी हा अभिनेता कर्जात बुडाला होता. परंतु, अवघ्या १५ वर्षांच्या वयात गश्मीरने वडिलांचं कर्ज कमी करायचा निर्णय घेतला.
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयासह अन्य क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं. यामध्येच रविंद्र महाजनी यांचंही नाव येतं. रविंद्र महाजनी यांनी अभिनयाव्यतिरिक्त अन्य काही व्यवसाय असावा यासाठी बांधकाम क्षेत्रात पार्टनरशीप केली. परंतु, या क्षेत्रात त्यांची मोठी फसवणूक झाली. इतकंच काय तर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राहत्या घरावरही जप्ती आली. त्यावेळी गश्मीरची आई नोकरी करत होती. मात्र, पगार तुटपुंजा होता. म्हणूनच, गश्मीरने कुटुंबाला साथ द्यायचा निर्णय घेतला.
गश्मीरने असा उभा केला पैसा
वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीरने त्याची डान्स अकादमी सुरु केली. याशिवाय तो नाटक, सिनेमा यांमध्ये मिळेल ती भूमिका करायचा. विशेष म्हणजे अवघ्या २ वर्षांमध्ये गश्मीरच्या डान्स अकादमीने चांगला जम बसवला आणि गश्मीरने घरावरचं सगळं कर्ज फेडलं.