मुक्ताईच्या दृष्टीकोनातून घडणार संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची भेट, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:43 IST2025-04-05T18:43:26+5:302025-04-05T18:43:55+5:30

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

digpal lanjekar sant dnyaneshwaranchi muktai marathi movie trailer release | मुक्ताईच्या दृष्टीकोनातून घडणार संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची भेट, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

मुक्ताईच्या दृष्टीकोनातून घडणार संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची भेट, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’  या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत दंग झालेले  कलाकार, वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका,  अभंगांच्या स्वरात चिंब  झालेले मायबाप प्रेक्षक, आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय  वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या भव्य आध्यात्मिक  चित्रपटाचा नेत्रदीपक ट्रेलर लॉन्च सोहळा आनंदात आणि उत्साहात पार पडला. अल्पावधीतच या ट्रेलरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.  रेश्मा कुंदन थडानी यांनी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या १८ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

संत पंरपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे अद्वितीय योगदान आहे. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवला. तसेच आध्यात्मिक समतेचा आधार घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायची सुरुवात केली. ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून वाईट वागणूक मिळाली. परंतु, खचून न जाता त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी भागवत संप्रदायाच्या शिकवणीत आपले स्थान निर्माण केले.  या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा हा  चित्रपट  आहे.  विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या या भावंडांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी  याप्रसंगी सांगितले. 

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत  समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा  चित्रपटात भूमिका आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

Web Title: digpal lanjekar sant dnyaneshwaranchi muktai marathi movie trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.