'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 20:33 IST2023-05-05T20:33:16+5:302023-05-05T20:33:55+5:30
Bharat Jadhav : भरत जाधवने ‘सही रे सही’ नाटकादरम्यानचा तो कधीही विसरू न शकणारा किस्सा सांगितला आहे.

'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधवने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्याने तिन्ही माध्यमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला आले होते. यावेळचा एक किस्सा त्याने नुकताच एका मुलाखतीत सांगितला.
भरत जाधव याने ‘महाराष्ट्राची लोकधारा’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ अशा अनेक नाटकांमधून काम केले आहे. त्याच्या जवळपास प्रत्येक प्रयोगाला नाट्यगृहाबाहेर हाउसफुलची पाटी लागते. एकदा त्याचे सही रे सही नाटक पाहायला बाळासाहेब ठाकरे यांनी हजेरी लावली होती. ते नाटक पाहून त्यांची काय प्रतिक्रिया होती हे भरतने शेअर केले.
भरत जाधव म्हणाला की, बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा माझ्या नाटकाला उपस्थिती लावली होती तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना इतका वेळ बसवेल की नाही अशी शंका वाटत होती. पण त्यांनी संपूर्ण नाटक पाहिले. त्या रात्री मी राज ठाकरे साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारले की, बाळासाहेबांना नाटक कसे वाटले? तेव्हा ते म्हणाले, ते घरी आल्यापासून गलगलेंसारखे बाळासाहेब उठले, बाळासाहेब निघाले असेच बोलत आहेत. गलगले या व्यक्तिरेखेचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेली ही प्रतिक्रिया भरत जाधवसाठी अविस्मरणीय होती. ही प्रतिक्रिया तो कधीही विसरू शकत नाही असेही त्याने सांगितले.