'माझा मित्रपरिवारही मोजका आहे'; 'या' कारणामुळे भरत जाधवला इंडस्ट्रीत नाहीत जास्त मित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 14:59 IST2023-05-07T14:58:35+5:302023-05-07T14:59:19+5:30
Bharat jadhav: 'मनोरंजन विश्वात बरंच गॉसिपिंग केलं जातं. काही वेळा...' भरत जाधव यांनी केला कलाविश्वातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुालासा

'माझा मित्रपरिवारही मोजका आहे'; 'या' कारणामुळे भरत जाधवला इंडस्ट्रीत नाहीत जास्त मित्र
मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे भरत जाधव (Bharat jadhav) . मराठीतील अभ्यासू आणि कसलेला अभिनेता म्हणून भरत जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे आजूबाजुला घडत असलेल्या कोणत्याही अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता त्यांनी इतकं वर्ष आपलं कामावर केंद्रित केलं आहे. त्यामुळेच आज ते यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जातात. यामध्येच अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मराठीतील देवमाणूस कोण हे सांगितलं.
भरत जाधव यांनी त्यांच्या करिअरमध्ये त्यांना नेमकं कोणाकडून शिकायला मिळालं याविषयी भाष्य केलं. याविषयी बोलत असताना दिवंगत अभिनेता विजय चव्हाण यांचा उल्लेख केला. ''विजू मामा म्हणजे एक नंबरी माणूस! अभिनेते म्हणून ते उत्तम होतेच, शिवाय माणूस म्हणूनही कमाल होते. आम्ही त्यांना देवमाणूस म्हणायचो. करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योग्य माणसांच मार्गदर्शन मिळालं की, आपण पावलं जपून टाकतो आणि आपल्याला यश मिळतंच,' असं भरत जाधव म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "विजू मामांनी मला कायम योग्य दिशा दाखवली. मनोरंजन विश्वात बरंच गॉसिपिंग केलं जातं. काही वेळा आपला त्यात संबंधही नसतो. तरी आपलं नाव त्यात गोवलं जात. त्यामुळे आपण कशातच पडू नये ही महत्त्वपूर्ण शिकवण त्यांच्याकडून मिळाली. जर करिअरमध्ये आपण अशा गोष्टींमध्ये भरकटत गेलो तर आपल्याला काहीच साध्य करता येत नाही. या गोष्टीचीही जाणीव झालं. त्यामुळे माझा मित्रपरिवारही मोजका आहे." दरम्यान, भरत जाधव सध्या 'तू तू मी मी हे नाटक' करत आहेत. हे नाटक विजय चव्हाण यांचं असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ते नाटक करत आहेत.