अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अॅक्टर अवॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:08 IST2025-07-24T10:06:31+5:302025-07-24T10:08:35+5:30
अशोक सराफ यांनी केवळ मराठी, हिंदी नव्हे तर भोजपुरी सिनेसृष्टीतही नाव कमावलंय.

अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अॅक्टर अवॉर्ड
'महाराष्ट्र भूषण' आणि 'पद्मश्री' पुरस्कार विजेते अशोक सराफ (Ashok Saraf) सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. ८०-९० च्या दशकातील त्यांचे प्रत्येक चित्रपट आजही सर्वांच्या लक्षात आहेत. अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि भोजपुरी सिनेसृष्टीतही नाव कमावलं. विशेष म्हणजे अशोक सराफ यांना भोजपुरीमधील त्या वर्षीचं बेस्ट अॅक्टर अवॉर्डही मिळालयं. याचा खुलासा खुद्द अशोक सराफ यांनी केलाय.
अशोक सराफ यांनी नुकतंच 'अमुक तमुक'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भोजपुरीमध्ये काम केल्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, "तुम्हाला जर वेळ असेल तर काम करा. मी हिंदीत जेव्हा मला वेळ असेल फक्त तेव्हाच काम केलंय. एक भोजपुरी प्रोड्युसर आला होता. मी कधी भोजपुरी केलेलं नाही. एक भूमिका होती. मी त्याला म्हटलं माझ्याकडे वेळ नाही. या १५ दिवसांत होत असेल तर बघ. तो म्हणाला हो चालेल. मी परफेक्ट त्यांची भाषा बोललोय. त्यांचा लेहेजा पकडला की तुम्ही भोजपुरी बोलू शकता. मला भोजपुरीचं त्या वर्षीच बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळालं. माझी जी भाषाच नाही त्या भाषेत मला अवॉर्ड मिळालं", असं अशोक सराफ यांनी सांगितलं.
अशोक सराफ यांनी भोजपुरीमध्ये केलेल्या चित्रपटाचं नाव 'माई के बिटुवा' असं आहे. या सिनेमात त्यांच्याशिवाय सदाशिव अमरापुरकरदेखील होते. अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. फक्त स्टार होणं सोपं असतं पण, स्टार झाल्यावर आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांनाच जमतं. आज वयाची पंचाहत्तरी ओलांडून सुद्धा अशोक सराफ टेलिव्हिजन, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम करत आहेत. त्यांचा फिटनेस, त्यांची एनर्जी आजच्या तरुणाईला लाजवेल अशीच आहे.दरम्यान, गेल्या २७ मे रोजी अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. याशिवाय, त्यांचे नाव लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आलेलं आहे.