अशोक सराफांचे आवडते सहकलाकार कोण? दिग्गज अभिनेत्यांंचं घेतलं नाव, वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:51 IST2025-07-21T11:50:48+5:302025-07-21T11:51:01+5:30
अशोक सराफ यांचे आवडते सहकलाकार कोण?

अशोक सराफांचे आवडते सहकलाकार कोण? दिग्गज अभिनेत्यांंचं घेतलं नाव, वाचून थक्क व्हाल!
पद्मश्री-महाराष्ट्रभूषण आणि मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आज वयाची पंचाहत्तरी ओलांडून सुद्धा अशोक सराफ टेलिव्हिजन, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये काम करत आहेत. अशोक सराफ यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र, अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांना काही सहकलाकार खास वाटतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आवडत्या सहकलाकारांच्या नावांचा उल्लेख केला. या यादीत काही दिग्गज आणि काही त्यांच्या काळातील लोकप्रिय चेहरे आहेत. तर नेमकं कोण आहेत हे कलाकार? चला जाणून घेऊया.
अशोक सराफ 'अमुक तमुक'ला दिलेल्या मुलाखतीत ज्याच्याबरोबर काम करताना कायम खूप मजा आली, देवाण-घेवाण करता आली, अशा आवडत्या सहकलाकाराबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "तसं सचिनबरोबर झालं. नंतर लक्ष्याबरोबर झालं. मी जो मार्ग अवलंबला, त्याच मार्गाने लक्ष्मीकांत आला. माझं टायमिंग त्याने बरोबर पकडलं होतं. त्यामुळे त्याच्याबरोबरचे सीन चांगलेच रंगायचे. आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ ५० चित्रपट एकत्र केले. मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची मजा यायची आणि स्क्रीनवरचा जो मी सगळ्यात जेंटलमन नट मी स्क्रीनवरचा पाहिला, ते म्हणजे निळू फुले. इतका ग्रेट माणूस होता. त्यांना अजिबात देणंघेणं नव्हतं. त्यांचं ते काम करायचे. एखादी व्यक्ती अमुक एखादी गोष्ट करतो म्हणून ती करायची, असं त्यांनी कधीच केलं नाही".
अशोक सराफ यांनी निळू फुले यांच्याबद्दल खास आठवण शेअर केली. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक प्रसंग आजही अशोक सराफ यांच्या मनात घर करून आहे. ते म्हणाले, "एक सीन आमच्याकडे आला, पण त्यामध्ये काही लिहिलं नव्हतं. मग दिग्दर्शकाने आम्हालाच लेखन करायला सांगितलं. मी काही डॉयलॉग सुचवत होतो, त्याला निळूभाऊ होकार देत होते. मी लिहितोय म्हणजे मी स्वतःसाठी अधिक लिहीन, असं काही त्यांच्या मनात आलं नाही. त्यांच्यात अजिबात अहंकार नव्हता. लेखन झाल्यावर आम्ही सीनचा सराव करत होते. तेव्हा मी एक वाक्य विसरलो. तर निळूभाऊंनी मला आठवण करून दिलं. असे प्रामाणिक नट ते होते. मला त्यांच्यासोबत काम करताना नेमही मजा यायची. सज्जन नट म्हणतात ना, तर ते तसेच होते". दरम्यान, निळू फुले आणि अशोक सराफ यांनी 'माझा पती करोडपती', 'ठकास महाठक' 'फटाकडी', 'बिनकामाचा नवरा', 'दीड शहाणे' 'गाव तसा चांगला पण वेशीला टांगलं', अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.