अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला-"आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:38 IST2025-05-28T11:33:10+5:302025-05-28T11:38:58+5:30
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान, मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला...

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला-"आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान"
Hemant Dhome : देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेल्या "पद्म पुरस्कार" वितरण समारंभाचा दुसरा टप्पा महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते काल अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला. यावेळी भारतातील ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल अशोक सराफ यांना गौरविण्यात आलं. सध्या मराठी कलाविश्वातून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच अशोर सराफ यांना पुरस्कार प्रदान झाल्यानंतर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने (Hemant Dhome) देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या विनोदी शैलीनं आणि अभिनयानं सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशोक सराफ यांचा झालेला सन्मान हा संपूर्ण भारतीय कलाकार वर्गासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठीही अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. याबद्दल इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अभिनेता हेमंत ढोमेने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या स्टोरीमध्ये त्याने लिहिलंय की, "या बहुरुपी महाराष्ट्र भूषणाचा आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान आहे. तुमची कारकीर्द आम्हा प्रेक्षकांना आपुलीच वाटते हिच एक अतुलनीय गोष्ट आहे...." अशी सुंदर स्टोरी त्याने लिहिली आहे.
दरम्यान, अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'आयत्या घरात घरोबा','अशी ही बनवाबनवी','बाळाचे बाप ब्रह्मचारी','भूताचा भाऊ','धुमधडाका'सह 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. विनोदी अभिनेता म्हणून ते लोकप्रिय झाले. सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. सिनेमांशिवाय अशोक सराफ यांनी रंगभूमीही गाजवली. हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी अभिनयाचा डंका गाजवला. 'सिंघम' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली.