उन्हाळ्याची सुट्टी अन् इंग्रजीची शिकवणी! खळखळून हसवत भावुक करणारा ‘एप्रिल मे ९९’चा ट्रेलर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:13 IST2025-05-17T11:12:35+5:302025-05-17T11:13:27+5:30

‘एप्रिल मे ९९’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर पाहून तुमच्याही उन्हाळ्याच्या आठवणी जाग्या होतील

April May 99 marathi movie trailer starring Sajiri Joshi Aaryan Menghji rohan mapuskar rajesh mapuskar | उन्हाळ्याची सुट्टी अन् इंग्रजीची शिकवणी! खळखळून हसवत भावुक करणारा ‘एप्रिल मे ९९’चा ट्रेलर बघाच

उन्हाळ्याची सुट्टी अन् इंग्रजीची शिकवणी! खळखळून हसवत भावुक करणारा ‘एप्रिल मे ९९’चा ट्रेलर बघाच

मराठी मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे हा सिनेमा म्हणजे  ‘एप्रिल मे ९९’.  सर्वांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आठवण ताजं करणाऱ्या ‘एप्रिल मे ९९’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तुम्हाला खळखळून हसवतोच शिवाय तुम्हाला भावुकही करतो. व्हेंटिलेटर हा सुपरहिट सिनेमा मराठी सिनेसृष्टीला देणारे मापुस्कर ब्रदर्स हा सिनेमा घेऊन येत आहेत.  ‘एप्रिल मे ९९’च्या ट्रेलरमध्ये काय दिसतं? जाणून घ्या

‘एप्रिल मे ९९’चा ट्रेलर

 ‘एप्रिल मे ९९’ च्या ट्रेलरमध्ये कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद ही धमाल तिकडी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाली असतानाच त्यांच्या सुट्टीच्या प्लॅनवर पालक विरजण घालताना दिसत आहेत. या सुट्ट्यांमध्ये त्यांची भेट जाईशी होते. जाईला कोकण फिरवत, तिच्यासोबत दंगामस्ती, धमाल करत असतानाच या दरम्यान त्यांच्यात निर्माण होणारी मैत्री, मस्तीचे क्षण आणि काही भावनिक वळणे या ट्रेलरमधून उलगडताना दिसत असून कोकणातील पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट प्रेक्षकांना त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी आहे. निसर्गरम्य कोकणचे दर्शनही या निमित्ताने घडत आहे. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, '' आपल्यापैकी अनेकांनी मे महिन्याची सुट्टी अशा पद्धतीने घालवली आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची जागा 'व्हेकेशन्स'ने घेतली आहे. अर्थात बाहेर फिरायला जाण्यात काहीच गैर नाही. प्रत्येकाची सुट्टीची व्याख्या वेगळी असते. असे असले तरी प्रत्येकाने आयुष्यात अशी सुट्टी नक्कीच एन्जॉय करावी. दिवसभर गावात हुंदडत, विहिरीत डुबक्या मारत, सायकलवर अख्खे गाव पालथे घालत, खोडकरपणा करण्यातली मज्जाच काही और आहे. हेच दाखवण्याचा प्रयत्न 'एप्रिल मे ९९'मध्ये करण्यात आला आहे. मोठ्यांना त्यांच्या सुट्टीची आठवण करून देणारा, लहानग्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीची खरी व्याख्या सांगणारा आणि संपूर्ण कुटुंब एकत्र एन्जॉय करेल असा हा चित्रपट आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, '' ट्रेलर पाहाताना अनेकांना आपल्या घरातील कथा असल्याचा भास झाला असेल. हा चित्रपट प्रेक्षकांना जवळचा वाटण्याचे कारण म्हणजे आपल्यापैकी अनेक जण एप्रिल मेच्या सुट्ट्या एन्जॉय करायला दरवर्षी कोकणात जातात. कोकणातील उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच गंमतीशीर आणि धमाल असतात. त्यामुळे हा चित्रपट पाहून तुम्ही पुढची उन्हाळ्याची सुट्टी अशीच प्लॅन कराल. यात चार किशोरवयीन मुले दिसत असली तरी ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांची आहे. मला खात्री आहे हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी होईल.  मुळात ‘एप्रिल-मे ९९’ हा फक्त चित्रपट नसून आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या उन्हाळ्या सुट्टीचा अनुभव जिवंत करणारा, रम्य ते बालपण असं सांगत, बालपणात रमविणारा एक निखळ प्रवास आहे.'' 

'एप्रिल मे ९९'मध्ये आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या २३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: April May 99 marathi movie trailer starring Sajiri Joshi Aaryan Menghji rohan mapuskar rajesh mapuskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.