'तांडव' वेब सीरिजवरून कंगनाचा संताप; म्हणाली, "जाणूनबुजून ती दृश्य टाकली, तुरुंगात टाका"
By जयदीप दाभोळकर | Updated: January 19, 2021 09:33 IST2021-01-19T09:30:46+5:302021-01-19T09:33:03+5:30
यापूर्वी वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आला होता एफआयआर

'तांडव' वेब सीरिजवरून कंगनाचा संताप; म्हणाली, "जाणूनबुजून ती दृश्य टाकली, तुरुंगात टाका"
गेल्या दिवसांपासून हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून अली अब्बास जफरच्या तांडव या वेब सीरिजवरून मोठा वादंग सुरू आहे. काही ठिकाणी या वेब सीरिज विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशात या वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकाविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तांडव या वेब सीरिजवरुन बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनं आता संताप व्यक्त करत त्या वेब सीरिजमध्ये ती दृश्ये जाणूनबुजून टाकल्याचं म्हटलं आहे.
"समस्या केवळ हिंदू फोबिक कंटेंटची नाही. हे रचनात्मकपणेही खराब आहे. प्रत्येक पातळीवर ते आपत्तीजनक आहे. यासाठीच जाणूनबुजून वादग्रस्त दृश्ये ठेवण्यात आली आहेत. त्यांना ना केवळ गुन्हाच्या पार्श्वभूमीवर तर प्रेक्षकांना टॉर्चर केल्यामुळेही तुरुंगात टाकलं पाहिजे," असं कंगना म्हणाली. तिनं ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.
याचदरम्यान, अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर तसंच विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तांडव या वेब सीरिजचा निर्मात अब्बास जफरने आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या बाजूनं सर्वांची माफी मागितली. तसंच कोणाचा अवमान करण्याचा किंवा कोणत्याही धर्म आणि राजकीय पक्षाचा अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता असं त्यांनी माफी मागताना म्हटलं आहे.
The problem isn’t just the Hindu phobic content, it’s also creatively poor and deprived,atrocious and objectionable on every level hence deliberately placed controversial scenes. Put them in jail not just for criminal intentions but also for torturing the viewer #tandavwebserieshttps://t.co/bmeaPzgkA5
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 18, 2021
चौकशी होणार
लखनौमध्ये अॅमेझॉन प्राईमच्या तांडव या वेब सीरिज विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यूपी पोलिसांच्या हुशार पोलीस अधिकाऱ्यांचे पथक पुढील कारवाईसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. लखनौच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात वेब सीरिजविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर चार पोलीस अधिकारी तपासासाठी मुंबईला रवाना झाले. हे अधिकारी वेबसीरिजचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांची चौकशी करू शकतात. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्याची दृश्ये आहेत. दुसरीकडे मिर्झापूरमध्ये वेब सीरिजविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.