२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 09:02 IST2025-05-25T09:02:18+5:302025-05-25T09:02:40+5:30
खऱ्या घटनेवर आधारीत 'इक्कीस' सिनेमाची घोषणा झाली असून धर्मेंद्र, जयदीप अहलावत सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत

२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या आगामी 'इक्कीस' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. मॅडॉक फिल्मसने काही तासांपूर्वी 'इक्कीस' सिनेमाचा मोशन पोस्टर रिलीज केला आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत असून सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे. जाणून घ्या सिनेमाविषयी सविस्तर
'इक्कीस' सिनेमाबद्दल
'इक्कीस' सिनेमाच्या टीझरमध्ये दाखवलेला टेलिग्राम संदेश खरा असून, तो अरुण यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्षात मिळालेला होता. या सिनेमाद्वारे भारतीय सेनेच्या शौर्याची आणि अरुण खेत्रपाल यांच्या बलिदानाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील 'बसान्तरच्या लढाई'वर आधारित आहे. या युद्धात २१ वर्षीय सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी शौर्य दाखवून परमवीर चक्र मिळवले होते. अरुण यांचं शौर्य आणि बलिदानाची कथा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.
कधी रिलीज होणार 'इक्कीस'
'इक्कीस' हा सिनेमा मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत असून, या सिनेमाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाच्या अधिकृत घोषणेनुसार 'इक्कीस' हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होईल. याच दिवशी 'कांतारा: चॅप्टर १' हा सिनेमाही प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होईल, अशी चिन्ह दिसत आहेत