धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ३४ वर्षीय मुलीचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:51 IST2026-01-02T13:49:39+5:302026-01-02T13:51:43+5:30
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुलीचा मृत्यू झाल्याने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या ३४ वर्षीय मुलीचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्कर विजेते दिग्गज अभिनेते टॉमी ली जोन्स यांची ३४ वर्षीय मुलगी व्हिक्टोरिया जोन्स हिचा मृतदेह सॅन फ्रान्सिस्को येथील एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे. गुरुवारी, १ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून जोन्स कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रसिद्ध 'फेअरमोंट हॉटेल'मध्ये राहायला गेली होती. पहाटे साधारण ३ वाजण्याच्या सुमारास ती हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडली. हॉटेल प्रशासनाने या घटनेची माहिती त्वरित स्थानिक पोलीस आणि वैद्यकीय पथकाला दिली. मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचून त्यांनी व्हिक्टोरियाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
BOMBSHELL😪: A Tragic Start to 2026: Remembering Victoria Jones (1991–2026)
— Satguy 141 (@satguy01) January 2, 2026
The New Year has begun with a somber note for Hollywood legend Tommy Lee Jones and his family. News has confirmed that his daughter, Victoria Jones, was tragically found deceased early Thursday morning… pic.twitter.com/r1Hkv8Pkfa
सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभाग आणि मेडिकल पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत पोलिसांना मृत्यूचे नेमके कारण कळाले नाही. काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी या प्रकरणात आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे, परंतु शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच व्हिक्टोरियाचा मृत्यू कसा झाला, याची स्पष्टता होईल. व्हिक्टोरियाच्या अशा अचानक जाण्यामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात असून चाहते जोन्स कुटुंबाचे सांत्वन करत आहेत.
व्हिक्टोरिया जोन्स ही टॉमी ली जोन्स आणि त्यांची एक्स पत्नी किम्बरली क्लॉघली यांची मुलगी होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले होते. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या जगप्रसिद्ध 'मेन इन ब्लॅक २' या चित्रपटात तिने छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने 'द थ्री बरियल्स ऑफ मेलक्विडेस एस्ट्राडा' या चित्रपटात आणि 'वन ट्री हिल' सारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते. टॉमी ली जोन्स हे त्यांच्या 'मेन इन ब्लॅक'मधील 'एजंट के' या पात्रासाठी जगभरात लोकप्रिय आहेत, मात्र आपल्या लाडक्या लेकीच्या निधनावर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.