एकट्यानं पाहण्याची हिंमत आहे का? 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स'चा ट्रेलर पाहून थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:48 IST2025-08-01T12:48:09+5:302025-08-01T12:48:35+5:30
'द कॉन्ज्युरिंग'चा शेवटचा भाग येतोय! ट्रेलर पाहून भीतीने थरकाप उडेल...

एकट्यानं पाहण्याची हिंमत आहे का? 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स'चा ट्रेलर पाहून थरकाप उडेल
The Conjuring Last Rites: जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर तुम्हाला हे देखील माहित असेल की काही चित्रपट इतके भयानक असतात की ते एकट्याने पाहण्याची हिंमत होत नाही. हॉरर चित्रपटांचे वेड असलेल्यांमध्ये 'The Conjuring' हे नाव आजही अंगावर शहारे आणतं. ही लोकप्रिय हॉरर फ्रँचायझी आता तिच्या अंतिम भागासह परतली आहे. 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स' या चित्रपटात एड आणि लॉरेन वॉरेन्स पुन्हा एकदा सैतानी शक्तींना सामोरे जाताना दिसणार आहेत. मात्र, यावेळी संकट त्यांच्या स्वतःच्या घरात पोहोचलं आहे. मुलगी मिया (टॉमलिन्सन) हिच्यावर सैतानी शक्तीचा प्रभाव असल्याचं त्यांना कळतं आणि तेथून खऱ्या अर्थाने थरार सुरू होतो. प्रेक्षकांना हॉरर फ्रँचायझीचा ट्रेलर खूप आवडला आणि आता ते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जवळपास १२ वर्षांपूर्वी, २०१३ साली रिलीज झालेल्या 'द कॉन्ज्युरिंग' (The Conjuring) या चित्रपटाने संपूर्ण जगात खळबळ माजवली होती. 'The Conjuring' नंतर या चित्रपटाचे अनेक भाग आले. या फ्रँचायझीत अनेक सपोर्टिंग पात्रांवर (Spin-Off Universe) आधारित चित्रपटही आहेत. 'द कॉन्ज्युरिंग' नंतर २०१४ साली 'अॅनाबेल' (Annabelle) प्रदर्शित झाला. त्यानंतर २०१६ साली 'द कॉन्ज्युरिंग २' (The Conjuring 2) आला. त्यानंतर २०१७ ला 'अॅनाबेल २' (Annabelle: Creation) आणि २०१८ ला 'द नन' (The Nun) प्रदर्शित झाला.
यानंतर २०१९ साली 'अॅनाबेल कम्स होम' (Annabelle Comes Home), २०२१ साली 'द कॉन्ज्यूरिंग: द डेविल मेड मी डू इट' (The Conjuring: The Devil Made Me Do It) आणि २०२३ मध्ये 'द नन २' (The Nun II) हे प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. आता 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स' (The Conjuring: Last Rites) पाहण्यासाठी हॉरर प्रेमी उत्सुक आहेत.