एका महिन्यात १० किलो वजन कमी करणं भोवलं! स्टेजवर परफॉर्म करताना गायिका बेशुद्ध, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:16 IST2025-11-12T10:10:27+5:302025-11-12T10:16:01+5:30
वाढलेल्या वजनामुळे गायिकेने तब्बल १० किलो वजन कमी केलं. पण ते तिच्या चांगलंच अंगाशी आलंय. स्टेजवर परफॉर्म करताना ही गायिका अचानक बेशुद्ध झाली. व्हिडीओ व्हायरल

एका महिन्यात १० किलो वजन कमी करणं भोवलं! स्टेजवर परफॉर्म करताना गायिका बेशुद्ध, व्हिडीओ व्हायरल
जगभरात प्रसिद्ध असलेली ३३ वर्षीय के-पॉप स्टार ह्यूना (HyunA) एका कॉन्सर्टदरम्यान अचानक स्टेजवर बेशुद्ध पडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तिच्या जगभरातील चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ह्यूना मकाऊ येथील वॉटरबॉम्ब २०२५ फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत असताना ही घटना घडली.
ह्यूना तिचं हिट गाणं 'बबल पॉप!' गात असताना अचानक कोसळली. ही घटना कॅमेरात कैद झाली आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. तिच्यासोबत असलेल्या डान्सर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला सावरलं आणि बॅकस्टेजला घेऊन गेलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्यूनाने गेल्या काही दिवसांत केवळ एका महिन्यात जवळपास १० किलो वजन कमी केले होते, ज्यामुळे तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. प्रेग्नन्सीच्या अफवांमुळे त्रस्त झालेल्या ह्यूनाने ३ ऑक्टोबरपासून कठोर डाएट प्लॅन सुरू केला होता. ४ नोव्हेंबर रोजी तिने सोशल मीडियावर सांगितले होते की तिचे वजन आता ४९ किलो झाले आहे.
कोरियन टाईम्सच्या मते, डॉक्टरांनी ह्यूनाच्या बेशुद्ध पडण्याचे कारण वसुवागल सिन्कोप (Vasovagal Syncope) असल्याचे निश्चित केले आहे. या आजारात ताण, थकवा, शरीरात पाण्याची कमतरता किंवा अति डाएटिंगमुळे हृदयाची गती, रक्तदाब अचानक कमी होतो, ज्यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडते. ह्यूनाला ही समस्या २०२० मध्ये पहिल्यांदा झाली होती.
ह्यूनाने मागितली चाहत्यांची माफी
या घटनेनंतर ह्यूनाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली. "या घटनेबद्दल मला खूप लाज वाटते. मी माझा पूर्ण प्रयत्न करू इच्छित होते, पण मला स्टेजवर काय झाले, हे आठवत नाही. मकाऊचे चाहते आणि माझ्या 'ए-इंग्स' (ह्यूनाच्या फॅन क्लबचे नाव) यांना निराश केल्याबद्दल मला वाईट वाटतंय. पण आता मी ठीक आहे, कृपया काळजी करू नका. मी माझा स्टॅमिना पुन्हा वाढवण्याचे काम करत आहे," असे तिने पोस्टमध्ये लिहिले.