Coldplayच्या क्रिस मार्टिनने घेतलं बाबुलनाथचं दर्शन, गर्लफ्रेंडने नंदीच्या कानात सांगितली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 08:36 IST2025-01-18T08:35:49+5:302025-01-18T08:36:09+5:30
दोघांनी पारंपिक भारतीय वेशभूषाही केली होती. त्यांच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकलं.

Coldplayच्या क्रिस मार्टिनने घेतलं बाबुलनाथचं दर्शन, गर्लफ्रेंडने नंदीच्या कानात सांगितली इच्छा
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये बहुप्रतिक्षित 'coldplay' कॉन्सर्ट होणार आहे. कालच हा ब्रिटिश बँड मुंबईत पोहोचला. coldplay चा मुख्य गायक क्रिस मार्टिन (Chris Martin)आणि त्याची गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनने मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दोघांनी पारंपिक भारतीय वेशभूषाही केली होती. त्यांच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
coldplay बँड तब्बल ९ वर्षांनी भारतात परफॉर्म करणार आहे. त्यामुळे करोडो चाहते यासाठी उत्सुक आहेत. आज, उद्या आणि २१ तारखेला नवीन मुंबईत कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली आहे. त्याआधी क्रिस मार्टिन काल चक्क मरीन ड्राईव्ह परिसरात दिसला होता. तेव्हा त्याला कोणीही ओळखलंही नाही. इतकंच नाही तर नंतर त्याने गल्फ्रेंड डकोटासह बाबुलनाथ मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. लाईट ब्लू रंगाचा कुर्ता, काळी पँट, गळ्यात उपरणंही घातलं होतं. या उपरणावर शिवाय असं लिहिलं होतं. तसंच त्याने गळ्यात माळही घातलेली दिसली. तर त्याच्यासोबत असलेल्या डकोटाने डार्क रंगाची कुर्ती, पँट घातली होती. भारतीय परंपरेप्रमाणे डकोटाने गाभाऱ्यासमोरील नंदीच्या कानात इच्छाही मागितली. कोल्डप्ले च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
कोल्ड प्ले बँड आपल्या 'म्युझिक ऑफ द स्फीअर्स वर्ल्ड टूरवर आहेत. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये १८,१९ आणि २१ जानेवारी रोजी त्यांचे तीन शो आहेत. यामधून ते आपल्या परफॉर्मन्सने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत.क्रिस मार्टिनसोबत त्याची गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनही आली आहे. डकोटा 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या सिनेमासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिससोबत तिचं ब्रेकअप झाल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आता ती देखील मुंबईत आल्याने या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.