"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
By कोमल खांबे | Updated: November 1, 2025 17:49 IST2025-11-01T17:49:30+5:302025-11-01T17:49:53+5:30
दिग्पाल लांजेकरांनी छावा सिनेमातील वादग्रस्त ठरलेल्या लेझीम दृश्यावर त्यांचं मत मांडलं. इतिहासाचा अभ्यास कमी पडला, असं ते स्पष्टपणेच म्हणाले.

"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
शिवराजअष्टकातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा जगासमोर मांडणारे दिग्पाल लांजेकर त्यांच्या आगामी 'अभंग तुकाराम' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत दिग्पाल लांजेकरांनी छावा सिनेमातील वादग्रस्त ठरलेल्या लेझीम दृश्यावर त्यांचं मत मांडलं. इतिहासाचा अभ्यास कमी पडला, असं ते स्पष्टपणेच म्हणाले.
दिग्पाल लांजेकर यांनी मराठी मनोरंजन विश्व या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ऐतिहासिक सिनेमातील लिबर्टीबद्दल बोलताना छावा सिनेमातील लेझीम नृत्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळले नसतील का? तर खेळले असतील कारण तो महाराष्ट्राचा मर्दानी खेळ आहे. परंतु, ते खेळत असताना प्रसंग कुठला आहे. त्याचं तारतम्य काय आहे? याचा विचार केला गेला पाहिजे, असं मला वाटतं. दुर्देव असं की आपल्या लोकांनी इतिहासाबद्दल खूप कमी लिहून ठेवलं आहे. त्यामुळे मी फिल्ममेकरची अडचण समजू शकतो. कारण मीदेखील त्यातून बऱ्याचदा जातो. अनेक ठिकाणी इतिहास मुका होतो. हे कसं घडलं त्याच्या नोंदी नाहीत. त्यामुळे त्या घटनांचे बिंदू तुम्हाला सापडतात आणि ते जोडण्यासाठी तुम्हाला लॉजिक वापरावं लागतं. कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं. एवढीच लिबर्टी घ्यावी असं मला वाटतं. म्हणजे मग असे वाद उद्भवत नाहीत. मी ७ चित्रपट केले पण एकदाही वाद झालेला नाही. कारण, ते श्रद्धेने केलेले आहेत".
"छावामधून नृत्य वगळलं गेलं तर त्याबद्दल माझं स्पष्ट मत असं आहे की थोडासा इतिहासाचा अभ्यास कमी पडला. सिनेमाच्या दिग्दर्शकाबद्दल अत्यंत आदराने मी नमूद करू इच्छितो की सहा महिन्यांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं. एवढा आभाळासारखा बाप हरपलेला असताना कोणताही मावळा, सरदार कोणीही कितीही आग्रह केला तरीही आकाशाएवढ्या पित्याला दैवत मानणाऱ्या राजपुत्राकडून नृत्य घडेल का? हा लॉजिकचा भाग आहे. त्याच वेळी स्वराज्याभोवतालची परिस्थिती... शिवाजी महाराजांचा छत्रपती बनतानाचा राज्याभिषेक झाला तेवढा मोठा सोहळा संभाजी महाराजांचा नाही झाला. कारण, त्यावेळी स्वराज्याच्या आजूबाजूची परिस्थिती ही संक्रमण अवस्थेसारखी होती", असंही ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की "शिवाजी महाराजांचं निधन झालेलं पाहून सगळे शत्रू एकाच वेळी तुटून पडले होते. अशावेळी कुठला मोठा राजपुत्र या सोहळ्यात रमणार नाही. परिस्थितीचं भान ठेवत संभाजी महाराजांनी तो सोहळा अगदी छोट्या स्वरुपात केला. यातून त्यांचा जाणतेपणा दिसतो. पण, यातून त्यांच्या व्यक्तिमत्तावर आपण प्रश्नचिन्ह उभं नाही का करत? हा तारतम्याचा भाग चित्रपट कर्त्यांनी बाळगला पाहिजे, असं आम्हाला वाटतं. त्यासाठी अभ्यास, त्याकाळच्या परिस्थितीचं भान, ते लॉजिक अभ्यासातून येतं".