"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:02 IST2025-05-20T10:02:10+5:302025-05-20T10:02:36+5:30
२०१३ ला अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर सूरज पांचोलीच्या आईने मोठा खुलासा करुन आजवर कधीही न ऐकलेली गोष्ट सांगितली आहे

"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूचं प्रकरण चांगलंच गाजलं. अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात सूरजच्या आईने अर्थात अभिनेत्री झरीना वहाब यांनी अलीकडेच काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. झरीना वहाब यांच्या मते सूरज आणि जिया यांचं नातं तिच्या मृत्यूच्या आधी काही महिन्यांपूर्वीच संपुष्टात आलं होतं. या ब्रेकअपमुळे जिया खूपच नैराश्यात गेली होती.
झरीना वहाब यांचा खुलासा
नयनदीपला दिलेल्या मुलाखतीत झरीना वहाब म्हणाल्या की, "मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे की, जेव्हा सलमान सूरजला सिनेमात लाँच करणार होता तेव्हा मी त्याला जियाशी नातं थांबवायला सांगितलं. त्यानंतर सूरजने तिला ब्रेकअप करुया असं सांगितलं. मी तुला कधी कधी भेटू शकते का? असं जिया त्याला म्हणाली. हो आपण भेटू शकतो पण फक्त मित्र म्हणून. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून नाही, असं सूरज तिला म्हणाला. त्यानंतर जिया सुद्धा तेलुगु सिनेमाच्या शूटिंगसाठी साउथला जाणार होती. परंतु तिला रिजेक्ट करण्यात आलं आणि ती आणखी डिप्रेशनमध्ये गेली."
झरीना वहाब पुढे म्हणाल्या, "ती खूप उदास होती त्यामुळे तिने सूरजला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शूटिंगमुळे सूरज तिचा फोन उचलू शकला नाही. फ्री झाल्यावर सूरजने फोन बघितला. त्यानंतर त्याने जियाला मेसेज केला की, मी आता फ्री आहे, तुला कॉल करु शकतो का? परंतु तोवर उशीर झाला होता आणि जियाने जगाचा निरोप घेतला होता." या प्रकरणात २०२३ मध्ये, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी सूरज पांचोलीला निर्दोष घोषित केलं. या निर्णयानंतर झरीना वहाब यांनी सांगितलं की, "सूरजने खूप त्रास सहन केला, पण अखेरीस सत्याचा विजय झाला."