'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:54 IST2025-12-22T13:49:23+5:302025-12-22T13:54:02+5:30
Border 2 Movie : सध्या 'बॉर्डर २' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, तो सनी देओलच्या १९९७ मधील गाजलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे.

'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
सध्या 'बॉर्डर २' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, तो सनी देओलच्या १९९७ मधील गाजलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. यामध्ये सनी देओलसोबतच वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. 'बॉर्डर'च्या पहिल्या भागातील लोकप्रिय कलाकार अक्षय खन्ना, सुनील शेट्टी आणि सुदेश बेरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या तिन्ही अभिनेत्यांचे चित्रपटात खास कॅमिओ असतील.
'मिड-डे'च्या रिपोर्टनुसार, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी आणि सुदेश बेरी या चित्रपटात नवीन पात्रांच्या रूपात दिसू शकतात. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दिग्दर्शक अनुराग आणि निर्माती निधी दत्ता यांना असे वाटले की, पहिल्या चित्रपटातील नायकांना या सीक्वलमध्ये आणणे हा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. म्हणूनच चित्रपटात त्यांच्या सेगमेंटचा समावेश करण्यात आला आहे. जुन्या आणि नवीन चित्रपटातील पात्रे एकमेकांना भेटतील, ही एक उत्तम संकल्पना आहे. विशेष म्हणजे, सुनील शेट्टी आणि अहान शेट्टी ही बाप-लेकाची जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसेल."
शूटिंगबद्दल
नोव्हेंबर महिन्यात मुंबईत अक्षय आणि सुदेश यांच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सुनील शेट्टी सध्या दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम करत असून त्याचा एक विशिष्ट लूक आहे, त्यामुळे त्याचे सीन्स ग्रीन स्क्रीनवर शूट करून त्यावर स्पेशल इफेक्ट्स वापरले गेले आहेत. 'बॉर्डर'मधील त्यांच्या मूळ अवताराशी साधर्म्य राखण्यासाठी डी-एजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून या तिन्ही अभिनेत्यांचे वय पडद्यावर कमी दाखवण्यात आले आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट?
'बॉर्डर २' हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटाचा टीझर आधीच प्रदर्शित झाला असून, त्यात सनी देओलचे दमदार संवाद ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटात वरुण धवन परमवीर चक्र विजेते मेजर होशियार सिंग दहिया यांच्या भूमिकेत, दिलजीत दोसांझ निर्मल जीत सिंग यांच्या भूमिकेत, तर अहान शेट्टी भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.