"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:22 IST2025-11-24T19:21:10+5:302025-11-24T19:22:03+5:30
बॉलिवूडमधील 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या जीवनात अनेक रंजक किस्से अथवा घडामोडी घडल्या आहेत. असाच एक किस्सा त्यांच्या राजकीय जीवनातीलही आहे.

"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 12 नोव्हेंबरला सुट्टीही देण्यात आली होती. मात्र, सोमवारी (24 नोव्हेंबर, 2025) त्यांची प्राणज्योत मालवली.
बॉलिवूडमधील 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांच्या जीवनात अनेक रंजक किस्से अथवा घडामोडी घडल्या आहेत. असाच एक किस्सा त्यांच्या राजकीय जीवनातीलही आहे. त्यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची शोले झलकही दिसली होती.
काँग्रेसच्या रामेश्वरलाल डुडी यांचा ६० हजार मतांनी पराभव -
भाजपच्या 'शायनिंग इंडिया' अभियानाने प्रेरित होऊन धर्मेंद्र यांनी राजकारणात एन्ट्री केली. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली होती. यानंतर, भाजपने त्यांना राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघातून उमेदवारी दिली. आपल्या प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रामेश्वरलाल डुडी यांचा ६० हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
निवडणूक प्रचारादरम्यान, धर्मेंद्र यांची 'शोले' स्टाईल -
या निवडणूक प्रचारादरम्यान, धर्मेंद्र यांची 'शोले' स्टाईल' दिसली होती. "जर सरकारने माझे ऐकले नाही, तर संसदेच्या छतावरून उडी मारेन!" असा डायलॉग त्यांनी मारला होता. त्यांच्या या सिनेमॅटिक डायलॉगने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
मात्र, ते खासदार झाल्यानंतर, बिकानेरमधील त्यांची कमी उपस्थिती, संसदेतील अल्प सहभाग, सातत्याचे चित्रीकरण आणि फार्महाऊसमधील त्यांची व्यस्तता, यांमुळे त्यांच्यावर 'निष्क्रिय खासदार' असल्याचा ठपका बसला होता. काही समर्थकांनी, ते पडद्याआड काम करत असल्याचे सांगून त्यांची पाठराखणही केली होती. २००९ मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण होताच, त्यांनी राजकारणात मोहभंग झाल्याचे म्हणत, पुन्हा कधीही निवडणूक न लढवण्याची घोषणआ केली होती. "काम मी करायचो आणि श्रेय दुसऱ्याला मिळायचे... कदाचित हे जग माझ्यासाठी नव्हते," अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली होती.