हॉटेलमध्ये घडलेल्या 'त्या' प्रसंगामुळे प्राण यांना प्रचंड घाबरल्या होत्या अरुणा इराणी; रडून रडून झाले होते हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:42 IST2023-12-18T17:41:12+5:302023-12-18T17:42:17+5:30
Aruna irani: 'द कपिल शर्मा शो'मध्ये अरुणा इराणी यांनी घडलेला प्रसंग सांगितला.

हॉटेलमध्ये घडलेल्या 'त्या' प्रसंगामुळे प्राण यांना प्रचंड घाबरल्या होत्या अरुणा इराणी; रडून रडून झाले होते हाल
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या खलनायकी भूमिका बॉक्स ऑफिसवर तुफान गाजल्या. यात आमरिश पुरी, प्रेम चोप्रा, प्राण, अमजद खान आणि रंजीत या कलाकारांच्या नावाचा आवर्जुन उल्लेख केला जातो. यामध्येच सध्या लोकप्रिय अभिनेता प्राण यांचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. त्या काळात प्राण यांच्या खलनायिकी भूमिका प्रचंड गाजल्या. त्यामुळे प्रत्यक्षातही अनेक जण त्यांना घाबरायचे. विशेष म्हणजे अभिनेत्री अरुणा इराणी सुद्धा त्यांना इतक्या घाबरल्या होत्या की त्यांना रडू कोसळलं होतं.
काही काळापूर्वी 'द कपिल शर्मा शो' मध्ये रंजीत, प्रेम चोप्रा आणि अरुणा इराणी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अरुणा इराणी यांनी प्राण यांचा एक किस्सा शेअर केला होता. एकदा प्राण आपला रेप करतील की काय असा गैरसमज अरुणा इराणी यांना झाला होता. मात्र, स्वत:ची चूक समजल्यानंतर त्यांना रडू कोसळलं.
"वयाच्या १९ व्या वर्षी मी करिअरची सुरुवात केली. यावेळी सुरुवातीलाच मला एक सिनेमा मिळाला ज्याचं चित्रीकरण हाँगकाँगला होणार होतं. त्यावेळी मी एकटीच हा प्रवास करणार होते. एकटीने प्रवास करायचा या विचारानेच माझा पोटात गोळा आला होता. त्यातही सेटवर पोहोचल्यानंतर मला कळलं की मला प्राण साहेबांसोबत स्क्रीन शेअर करायची आहे. त्यावेळी त्यांच्या खलनायिकी भूमिकांमुळे त्यांना सगळेच घाबरायचे. माझंही तेच झालं होतं,"असं अरुणा इराणी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "ज्यावेळी आमच्या सीनचं शूट संपलं त्यावेळी आम्ही एकत्रच परत येणार होतो. परंतु, इथे भारतात आल्यानंतर काही कारणास्तवर आम्हाला कोलकात्तामध्ये एक दिवसाचा मुक्काम करावा लागला. रात्री हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर मी माझ्या रुमकडे जात होते. त्याचवेळी प्राण सुद्धा माझ्या मागे-मागे येऊ लागले. त्यांना पाहून मी प्रचंड घाबरले. मला वाटलं आज नक्कीच माझ्यासोबत काहीतरी चुकीचं, रेप वगैरे होणार आहे. पण, प्राण यांनी माझ्या रुमजवळ येईन मला स्वत:ची काळजी घ्यायला सांगितलं. तसंच रात्री दरवाजा नीट बंद कर, काही वाटलं तर मला सांग मी शेजारच्याच रुममध्ये आहे', असं सांगितलं.
दरम्यान, "प्राण यांच्याविषयी मी मोठा गैरसमज करुन घेतला होता. त्यामुळे मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला. ज्यामुळे मी रुममध्ये गेल्यावर खूप रडले."