महिनाभरानंतर विवेक ओबेरॉयने पाहिला 'धुरंधर'! अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला-"हा फक्त एक चित्रपट नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:15 IST2026-01-08T17:13:33+5:302026-01-08T17:15:40+5:30
प्रदर्शनाच्या महिनाभरानंतर विवेक ओबेरॉयने पाहिला 'धुरंधर', कलाकारांसाठी लिहिली लक्षवेधी पोस्ट, म्हणाला...

महिनाभरानंतर विवेक ओबेरॉयने पाहिला 'धुरंधर'! अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला-"हा फक्त एक चित्रपट नाही..."
Vivek Oberoi Reaction On Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे. सध्या या चित्रपटाची जगभरात चर्चा होत असून समीक्षकांसह प्रेक्षकांक़डून वाहवाह मिळते आहे. अनेक कलाकार तसेच सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी या चित्रपटाचं भरभरुन कौतुक करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने हा चित्रपट पाहून त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
I finally watched #Dhurandhar after missing it in the GCC, and I am mind blown. This is more than cinema; it is the jarring shock of a switch being flicked in a pitch-black room.
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) January 7, 2026
If you have ever stood in the heavy, airless silence of a martyr’s home—where the walls are crowded… pic.twitter.com/39yxrCMR64
विवेक ओबेरॉयने त्याच्या एक्स हँडलवर 'धुरंधर' चित्रपटाबद्दल एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर या पोस्टमध्ये अभिनेत्याने चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या पोस्टद्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त करत विवेकने म्हटलंय,"मी सुद्धा धुरंधर चित्रपट पाहिला,हा फक्त एक चित्रपट नाहीतर एक उत्कृष्ट कलाकृती आहे."
यानंतर त्याने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांबद्दल लिहिलंय, "जर तुम्हाला सैनिकांच्या घरांमध्ये रिकाम्या डोलणाऱ्या खुर्च्या तसंच आपल्यासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव असेल, शिवाय आपल्या वडिलांच्या फोटोकडे पाहत आठवणीत बुडालेल्या सैनिकांचे दुःख ज्याला समजत असेल, तरच तुम्ही हा चित्रपट खऱ्या अर्थाने समजू शकाल. या चित्रपटाच्या विरोधात असलेले लोक तेच आहेत ज्यांना सत्य माहित नाही."
या पोस्टमध्ये दिग्दर्शकाचं कौतुक करत विवेक ओबेरॉयने म्हटलंय,"आदित्य धरने हा
३ तास ३४ मिनिटांचा असा चित्रपट बनवला आहे, जो तुम्हाला पडद्याला खिळवून ठेवतो. यातून त्याची मेहनत आणि प्रतिभा स्पष्टपणे दिसून येते."
त्यानंतर अभिनेत्याने 'धुरंधर'मधील प्रत्येक कलाकाराच्या कामाचं वर्णन आणि प्रशंसा केली आहे. त्याने रणवीर सिंगबद्दल या पोस्टमध्ये लिहिलंय, "जे काम खूप गाजावाजा करून करता आलं नसतं ते रणवीरने चित्रपटात शांतपणे करून दाखवलंय. अक्षय खन्नाने साकारलेल्या क्रूर रेहमान डकैतने प्रेक्षकांची मने जिंकली.रहमान खरोखरच मनात भीती निर्माण करतो.अभिनयाच्या बाबतीत माधवन खूप हुशार आहे. त्याचा अभिनय अंगावर शहारे आणणारा आहे.आता मी दुसरा भाग पाहण्यासाठी फार उत्सुक आहे. माझ्यावर भावांच्या स्थानी असलेले संजय दत्त आणि अर्जुन रामपाल या दोघांनीही या चित्रपटामध्ये जीव ओतून काम केलंय.आदित्य धर आणि 'धुरंधर'च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन...", अशी पोस्ट अभिनेत्याने लिहून सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
उत्कृष्ट कथा, कलाकारांचा दमदार अभिनय आणि अप्रतिम संगीतामुळे या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांकडून दाद मिळते आहे. ५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला. धुरंधरमध्ये रणवीरसह अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांसारखे दमदार कलाकार आहेत.