'छावा' काही थांबेना! बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, २४ व्या दिवशी किती कमावले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 10:15 IST2025-03-10T10:15:28+5:302025-03-10T10:15:49+5:30
'छावा'नं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आहे.

'छावा' काही थांबेना! बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, २४ व्या दिवशी किती कमावले?
Chhaava Box Office Collection Day 24: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर केवळ 'छावा'चं राज्य आहे. 'छावा' प्रदर्शित होऊन आता २४ दिवस झाले आहेत. २४ दिवस उलटूनही प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात सिनेमा यशस्वी ठरतोय. 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला असून या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
'छावा' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २२५.२८ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या आठवड्यात १८६.१८ कोटींची कमाई केली होती. यानंतर तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ८४.९४ कोटी कमावले होते. आता अवघ्या २४ दिवसात सिनेमानं भारतात ५२०.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात ६९१कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता सिनेमा १ हजार कोटी कधी पार करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या तीन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या चित्रपटांचा 'छावा'समोर टीकाव लागला नाहीये. त्यामुळं हा मार्च महिना देखील बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं राज्य असणार हे नक्की आहे.
''छावा'नं अभिनेता सलमान खानच्या 'सुलतान' (६१४ कोटी रुपये) आणि सनी देओलच्या 'गदर २' (६९१ कोटी रुपये) च्या कलेक्शनला मागे टाकले आहे. आता येत्या काळात कुणाचे रेकॉर्ड मोडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना आहे. तर आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.