भगवान परशुरामांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता सोडणार मांसाहार आणि दारू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:29 IST2025-11-06T11:28:30+5:302025-11-06T11:29:07+5:30
भगवान विष्णूंचा अवतार असणाऱ्या चिरंजीवी परशुराम यांच्या भूमिकेसाठी अभिनेता दारू आणि मांसाहार सोडणार आहे.

भगवान परशुरामांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता सोडणार मांसाहार आणि दारू
Vicky Kaushal To Quit Alcohol Non Veg: 'छावा' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर अभिनेता विकी कौशल आता एका मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. तो लवकरच दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या 'महावतार' चित्रपटात भगवान विष्णूंचे चिरंजीवी अवतार परशुराम यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी विकी कौशलने त्याच्या जीवनशैलीसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय.
'महावतार' चित्रपटाचे काम सुरू करण्यापूर्वी, विकी कौशलने त्याच्या जीवनशैलीत काही मोठे बदल करण्याची तयारी केली आहे. परशुराम यांची भुमिका साकारताना विकी कौशलने मद्य आणि मांसाहार पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भगवान परशुरामांच्या व्यक्तिरेखेबद्दल आदर आणि भूमिकेच्या आध्यात्मिक शिस्तीला मूर्त रूप देण्याचा हा विकीचा प्रयत्न आहे. विकी कौशलने घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
विकी व अमर कौशिक यांनी हा चित्रपट जागतिक दर्जाचा बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनेश विजान म्हणाले, "आम्ही 'महावतार' वर काम करत आहोत, जो आमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट आहे. आम्हाला तो एका जागतिक दर्जाच्या चित्रपटासारखा भव्य बनवायचा आहे, ज्यासाठी आमच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे".
'महावतार' चित्रपट भगवान विष्णूचा अवतार असलेल्या परशुरामांची कथा असेल. मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजान यांनी मे २०२५ मध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा केली होती. विकी कौशल अभिनीत 'महावतार'ची घोषणा नोव्हेंबर २०२४ मध्ये झाली होती. हा चित्रपट २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होईल आणि २०२८ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विकी कौशल सध्या संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.