"मला पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग...",'धुरंधर २'बद्दल विकी कौशल काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:43 IST2026-03-26T09:42:19+5:302026-03-26T09:43:18+5:30
दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे.

"मला पहिला भाग खूप आवडला होता, पण दुसरा भाग...",'धुरंधर २'बद्दल विकी कौशल काय म्हणाला?
दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. यातच आदित्य धरसोबत 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'मध्ये काम करणाऱ्या विकी कौशल (Vicky Kaushal) याने चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दिल्ली २०२६' मध्ये विकीने या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.
'उरी' चित्रपटामुळे विकी कौशल आणि आदित्य धर या दोघांच्याही करिअरला एक वेगळी उंची मिळाली होती. 'धुरंधर २' बद्दल बोलताना विकी म्हणाला, "हा चित्रपट इतकी मोठी कामगिरी करत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. आदित्य एक असाधारण चित्रपट निर्माता आहे आणि त्याला या चित्रपटात अतिशय तगड्या कलाकारांची साथ मिळाली आहे. मला पहिला भाग खूप आवडला होता आणि दुसरा भाग पाहण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे".
"अद्याप चित्रपट पाहिला नाही, पण..."
विकीने प्रांजळपणे कबुली दिली की, त्याने अजून 'धुरंधर २' पाहिलेला नाही. तो म्हणाला, "दिल्लीहून मुंबईला परतल्यावर मी सर्वात पहिली कोणती गोष्ट करणार असेन, तर ती म्हणजे थिएटरमध्ये जाऊन 'धुरंधर २' पाहणे".
कमाईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, रणवीर सिंगच्या या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांतच जगभरात १,००० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. २०२६ मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा हा सिनेमा ठरला आहे. सध्या प्रत्येकाच्या तोंडी या चित्रपटाचं नाव आहे. प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळी देखील या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत.