'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:28 IST2025-11-24T13:26:18+5:302025-11-24T13:28:14+5:30
धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन. सिनेसृष्टी आणि धर्मेंद्र यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे

'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. परंतु आज (२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
विले पार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब आणि धर्मेंद्र यांचे चाहते उपस्थित आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धर्मेंद्र पश्चात त्यांची पत्नी हेमा मालिनी. याशिवाय सनी देओल, बॉबी देओल, ईशा, अहाना, विजेता, अजीता ही सहा मुलं आहेत. धर्मेंद्र हे देओल कुटुंबाचे भक्कम आधारस्तंभ होते. त्यामुळे देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या निधनाने शोकाकूल झालं आहे.
धर्मेंद्र यांनी गेली सहा दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांची भूमिका असलेले 'शोले', 'दादागिरी', 'आग ही आग', 'जीने नही दुंगा', 'धर्म और कानून', 'बर्निंग ट्रेन' या सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारले. धर्मेंद्र यांच्या तगड्या अॅक्शनमुळे त्यांना बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखलं जातं. धर्मेंद्र यांचे अलीकडेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' हे दोन सुपरहिट सिनेमे रिलीज झाले. धर्मेंद्र यांचा आगामी सिनेमा 'इक्कीस' २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे.