वडील जिवंत असूनही मुलांनी केलं श्राद्ध! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर बघून व्हाल भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 16:13 IST2024-12-02T16:12:46+5:302024-12-02T16:13:28+5:30
बाप-लेकाची हृदयस्पर्शी कहाणी असलेल्या 'वनवास' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (vanvaas, nana patekar)

वडील जिवंत असूनही मुलांनी केलं श्राद्ध! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर बघून व्हाल भावुक
नाना पाटेकर (Nana Patekar) हे मराठी-हिंदी-साऊथमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते. नानांचे सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करताच शिवाय त्यांना भावुक करतात. नाना पाटेकरांचा अशाच एका आगामी सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे 'वनवास' (Vanvaas Movie). काही दिवसांपूर्वी 'वनवास'चा टीझर रिलीज झाला होता. अन् आज नुकतंच सिनेमाचा ट्रेलर युट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवर रिलीज करण्यात आलाय. 'वनवास'चा ट्रेलर पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल, यात शंका नाही.
'वनवास'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला पाहायला मिळतंं की, नाना पाटेकर त्यांची पत्नी आणि मुलांसोबत मजेत जगत असतात. आयुष्याच्या सुरुवातीला नाना त्यांच्या कुटुंबासोबत मजेत क्षण घालवतात. पुढे अचानक ट्रेलर काही वर्षांनी पुढे सरकतो. मग पाहायला मिळतं की वाराणसीच्या एका धार्मिक मेळाव्यातील गर्दीत नानांची मुलांसोबत ताटातूट होते. आपली मुलं अशी एकट्याला टाकून कशी गेली? याचा नानांना धक्का बसतो. पुढे ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबद्दल माहिती पोलिसांना सांगतात.
दुसरीकडे नानांच्या लाडक्या लेकांनी त्यांचं श्राद्ध केलेलं असतं. वडील जिवंत आहेत की नाही, याची माहिती न घेता ती मुलं त्यांचं श्राद्ध उरकतात इतकंच नव्हे तर वडिलांचं डेथ सर्टिफिकेटही काढतात. वाराणसीला अडकलेल्या नानांना मात्र मुलांवर विश्वास असतो. मग पुढे नानांना त्यांच्या घरी पोहोचवायला मदत करण्यासाठी उत्कर्श शर्माची एन्ट्री होते. पुढे काय घडणार? हे सिनेमा आल्यावरच कळेल. 'गदर' आणि 'गदर 2' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. २० डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.