उर्मिला मातोंडकरने पुन्हा रिक्रिएट केला गाजलेला डान्स, 'रंगीला'ची ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:15 IST2025-09-08T14:12:03+5:302025-09-08T14:15:00+5:30
रंगीलाला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उर्मिला मातोंडकरने सिनेमातील गाजलेल्या गाण्यावर डान्स करत सर्वांचं लक्ष वेधलंय

उर्मिला मातोंडकरने पुन्हा रिक्रिएट केला गाजलेला डान्स, 'रंगीला'ची ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जल्लोष
९० च्या दशकात बॉलिवूडमधील गाजलेला चित्रपट म्हणजे 'रंगीला' .या आयकॉनिक चित्रपटाला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. ८ सप्टेंबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर फॅशन, संगीत आणि अभिनयाच्या दुनियेतही एक नवा ट्रेंड सेट केला. या खास प्रसंगी 'रंगीला' चित्रपटाची नायिका उर्मिला मातोंडकरने एक भावनिक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. याशिवाय 'रंगीला'च्या गाजलेल्या गाण्यावर तिने डान्स केलाय.
'रंगीला'चा गाजलेला डान्स उर्मिलाने केला रिक्रिएट
उर्मिलाने 'रंगीला' चित्रपटातील 'होजा रंगीला रे' गाण्यावर खास डान्स केलाय. ५१ वर्षीय उर्मिलाचा हा डान्स बघून लोकांना 'रंगीला'मधील मिलीची आठवण आली. उर्मिलाने हा व्हिडीओ पोस्ट करुन एक भावनिक पोस्ट लिहिली. ती लिहिते की, ''रंगीला या चित्रपटाला ३० वर्षे झाली... ‘रंगीला’ने माझे आयुष्य कायमचे बदलले. राम गोपाल वर्मा यांचे दिग्दर्शन, आमिर खान आणि जॅकी श्रॉफसारखे अप्रतिम सहकलाकार, ए.आर. रहमान यांचे जादुई संगीत आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम, या सर्वांशिवाय हे शक्य नव्हते. ‘मिली’ आजही माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.”
‘रंगीला’ या चित्रपटातील उर्मिलाच्या स्टाईलने, विशेषतः तिच्या कपड्यांनी, तरुणाईला वेड लावले होते. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेले कपडे त्या काळात खूप लोकप्रिय झाले. या चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले होते आणि ते प्रचंड गाजले. ‘रंगीला रे’, ‘तनहा तनहा यहाँ पे जीना’ आणि ‘क्या करे क्या ना करे’ यांसारखी गाणी आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत.
‘रंगीला’ हा चित्रपट एका सामान्य मुलीच्या, मिलीच्या स्वप्नांवर आधारित होता, जी एक मोठी अभिनेत्री बनू इच्छिते. या चित्रपटात आमिर खानने साकारलेला ‘मुन्ना’ नावाचा टपोरी मित्र आणि जॅकी श्रॉफने साकारलेला सुपरस्टार ‘राज कमल’ यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने त्या वर्षी अनेक पुरस्कार जिंकले आणि बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली. आज या आयकॉनिक चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत.