'टक्कल करायला सांगितलं तेव्हा माझं लग्न ठरलं होतं...'; 'तुंबाड' फेम मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा
By देवेंद्र जाधव | Updated: September 4, 2025 13:22 IST2025-09-04T13:20:30+5:302025-09-04T13:22:04+5:30
टक्कल करणं हा धाडसी निर्णय होता. त्यानंतरचा अनुभव वेदनादायी होता, असा खुलासा तुंबाड फेम अभिनेत्री ज्योती मालशेने केला आहे.

'टक्कल करायला सांगितलं तेव्हा माझं लग्न ठरलं होतं...'; 'तुंबाड' फेम मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा
२०१८ साली रिलीज झालेला 'तुंबाड' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने प्रेक्षकांंचं प्रेम मिळवलंच शिवाय सिनेमातील कलाकारांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. याच सिनेमात मराठी अभिनेत्री ज्योती मालशेने भूमिका साकारली होती. 'तुंबाड'मध्ये विनायकच्या आईची भूमिका मराठमोळी अभिनेत्री ज्योती मालशेने साकारली. या भूमिकेसाठी ज्योतीला टक्कल करावं लागलं होतं. लग्न तोंडावर असताना ज्योतीने हा निर्णय कसा घेतला, याचा किस्सा तिने पहिल्यांदाच सांगितला आहे.
ज्योती मालशेने सांगितला टक्कल करण्याचा अनुभव
ज्योती मालशेने रसिकमोहिनी या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सविस्तर सांगितला आहे. २०१२ मध्ये ज्योतीला 'देऊळ' सिनेमाच्या टीममधील एकाकडून सांगण्यात आलं की, 'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेने तिला भेटायला बोलावलंय. ज्योती राहीला भेटायला गेली. राहीने तिला स्क्रीप्ट वाचायला सांगितली. ज्योतीला स्क्रीप्ट प्रचंड आवडली. 'तुंबाड'मधील कोणताही रोल तिला करायला आवडेल, असं ती म्हणाली. राहीने तिला विनायकच्या आईची भूमिका ऑफर केली. ज्योतीने ती स्वीकारली. या भूमिकेसाठी तुला टक्कल करावं लागेल, असं ज्योतीला सांगण्यात आलं. ज्योतीने नकार दिला कारण तिचं लग्न ठरलं होतं.
ज्योतीच्या म्हणण्याचा आदर ठेवत राहीने तिला टक्कल असलेली कॅप लावायची परवानगी दिली. दिग्गज आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी ही कॅप डिझाईन केली होती. सुरुवातीला ज्योतीचा जेवढा रोल सध्या आपण पाहतो त्यापेक्षा छोटासा होता. ज्योती हा अनुभव सांगत पुढे म्हणाली की, ''पुढे २०१५ ला मला राहीचा पुन्हा फोन आला. आपण तुंबाड रीशूट करतोय, असं त्याने मला सांगितलं. २०१५ मध्ये आनंद गांधी क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून 'तुंबाड' सिनेमाशी जोडले गेले. पण त्यावेळी मला टक्कल करावं लागेल, अशी अट घालण्यात आली. आमच्या कुटुंंबात फिल्मी बॅकग्राऊंडशी कोणी नव्हतं. त्यामुळे निर्णय मलाच घ्यायचा होता.''
''हे ऐकल्यावर दोन दिवस मी संपूर्ण विचारात होते. मला झोप येत नव्हती. माझ्या जवळच्या मित्रांचं मी यासाठी डोकं खाल्लं. सुदैवाने माझा नवरा माझ्या पाठीशी लगेच उभा राहिला. त्यामुळे बिनधास्त हा निर्णय घेतला. माझे कंबरेएवढे केस होते. टक्कल करताना मी कोणालाही बरोबर घेऊन गेले नव्हते. २०१५ मध्ये 'तुंबाड'चं शूटिंग केल्यानंतर मला खूप मोठा ब्रेक घ्यावा लागला. टक्कल केल्याने २ वर्ष मी काही काम केलं नाही. टक्कल केल्यानंतर दोन दिवस मी विग वापरला. पण नंतर मी अशाच अवस्थेत टक्कल घेऊन फिरत होते. एप्रिलमध्ये मी टक्कल केल्याने ते उन्हाळी दिवस माझे सुखाचे गेले.''
''अजूनही तो विचार केला की मला भीती वाटते. म्हणजे वस्तऱ्याने केस कापणं ही फार मोठी गोष्ट होती. नुसता हेअरकट केला तरी आपण थोडेसेच केस कापतो. त्यावेळी मी ते संपूर्ण केस कापले असल्यामुळे तो अनुभव माझ्या अंगावर येणारा होता. दोन-दोन दिवसांनी मला वाढलेले केस कापावे लागायचे. पण सुदैवाने दोन-तीन शूटिंग शेड्युलमध्ये माझं काम झालं होतं.'' अशाप्रकारे ज्योती मालशेने हा अनुभव सर्वांना सांगितला.