वडिलांचा चित्रपट फ्लॉप, घर विकावं लागलं, पुढे लेकानं आईला भेट दिलं ८ बीएचके इतकं मोठं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:57 IST2025-05-30T14:56:54+5:302025-05-30T14:57:14+5:30
कधीतरी राहतं घर विकावं लागलं होतं, आज एवढे पैसे कमावलेत की...

वडिलांचा चित्रपट फ्लॉप, घर विकावं लागलं, पुढे लेकानं आईला भेट दिलं ८ बीएचके इतकं मोठं घर
फिल्म इंडस्ट्री म्हटलं की झगमगतं आयुष्य, रेड कार्पेट, फॅन्स आणि करोडोंची कमाई हे डोळ्यासमोर येतं. पण, या सर्वाच्या मागे लपलेली असते एक अनिश्चितता. चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी होणं सोपं नसतं. अनेकदा मोठे चित्रपट फ्लॉप होतात आणि निर्मात्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कर्ज वाढत जातं आणि कधीकधी मालमत्ता विकावी लागण्याची वेळ येते. असंच घडलं होतं "जग्गू दादा" म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांच्या सोबत. मोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर जॅकी श्रॉफ यांना आपलं राहतं घर विकावं लागलं होतं. नुकतेच एका मुलाखतीमध्ये जॅकी श्रॉफ यांचा लेक आणि अॅक्शन स्टार टायगर श्रॉफनं वडिलांचा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती कशी बिघडली त्याबद्दल सांगितलं.
टायगर श्रॉफनं काही दिवसांपूर्वी 'जीक्यू'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील संघर्षमय काळ उलगडला. टायगर फक्त १२ वर्षांचा असताना त्याच्या आईने 'बूम' या चित्रपटाची निर्मिती केली होती. अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, झीनत अमान, कतरिना कैफ, गुलशन ग्रोव्हर यांसारख्या मोठ्या स्टारकास्ट असताना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा कतरिना कैफचा डेब्यू चित्रपट होता. पण चित्रपट चालला नाही आणि श्रॉफ कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आलं होतं.
टायगर म्हणाला, "त्या काळात मी आमच्या घरातील एकेक वस्तू विकली जाताना पाहिलं होतं. इथपर्यंत की माझा पलंगही विकावा लागला होता. मी जमिनीवर झोपायचो. तेव्हा मला वाटायचं की काहीतरी काम करावं, पण वय आणि परिस्थितीमुळे काहीच करू शकत नव्हतो". फक्त वस्तू नव्हे, तर जॅकी श्रॉफ यांना वांद्रेतील राहतं घरही विकावं लागलं होतं आणि नंतर त्यांनी एक छोटंसं घर घेतलं. पण, या अडचणींनंतर टायगरने 'हिरोपंती'सारख्या यशस्वी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाय रोवले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तो यशाच्या शिखरावर पोहोचला. पुढे त्याने मेहनतीनं कमावलेल्या पैशातून खार येथे ८ बीएचके इतकं मोठं आलिशान घर खरेदी केलं आणि ते आईला भेट म्हणून दिलं.
टायगर श्रॉफचे आगामी प्रोजेक्ट
टायगर श्रॉफच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'लग जा गले' या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. राज मेहता दिग्दर्शित आणि करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत असणार आहे. जान्हवी व टायगर दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा एक अॅक्शन चित्रपट असेल. टायगर श्रॉफ त्याच्या 'बागी ४' चित्रपटाच्या प्रमोशननंतरच 'लग जा गले'चे शूटिंग सुरू करेल.