केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:31 IST2024-10-24T13:30:10+5:302024-10-24T13:31:16+5:30
बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना घडला प्रकार

केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच, सलमानला ठार मारण्याच्या धमकीचा संदेश वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर आला. काही दिवसांनी संदेश पाठवणाऱ्याने माफीही मागितली. अखेर, तपासाअंती यामागे झारखंड कनेक्शन उघडकीस येताच, वरळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हुसेन शेख (२४) असे त्याचे नाव आहे. गंमत म्हणून त्याने तो संदेश पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे.
शेखने पाठवलेल्या धमकीच्या संदेशाचा तपास सुरू असतानाच त्याच क्रमांकावरून वाहतूक पोलिसांना, सॉरी... माझी चूक झाली, तो संदेश चुकून पाठवला गेला, असा संदेश आला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने केलेल्या तपासात धमकी देणारा आरोपी झारखंडचा असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला जमशेदपूरमधून अटक केली. आरोपी बेरोजगार असून केवळ गंमत म्हणून त्याने धमकीचा संदेश पाठवल्याचे निष्पन्न झाले.
संदेश काय होता?
सलमानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिष्णोईबरोबरचे शत्रुत्व संपवायचे असेल तर ५ कोटी रुपये द्यावे लागतील. ही रक्कम दिली नाही तर बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल. हा संदेश सलमानने गांभीर्याने घ्यावा, असा संदेश हुसेन शेख याने पाठवला होता.
पुन्हा धमकी...
शेखच्या माफीच्या संदेशानंतर वाहतूक पोलिसांना आणखी एक संदेश आला. त्यात, सलमानने पैसे दिले नाही तर त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. तपासात गुवाहाटी येथून हा संदेश आल्याचे स्पष्ट झाले. संदेश पाठवणारा १७ वर्षांचा मुलगा निघाला. त्यामुळे त्याला नोटीस बजावून समज देण्यात आली आहे.