धर्मेंद्र यांच्या दमदार आवाजात त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; चाहते झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:35 IST2025-11-24T12:32:58+5:302025-11-24T12:35:52+5:30
असामान्य व्यक्तिमत्व घडवणाऱ्या वडिलांची भावुक कहाणी; धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर पाहून चाहत्यांना आनंद आणि उत्सुकता आजारपणाशी झुंज देणाऱ्या धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला, चाहते झाले भावुक

धर्मेंद्र यांच्या दमदार आवाजात त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; चाहते झाले भावुक
धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे चर्चेत होते. तब्येतीच्या कारणास्तव धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात होते. इतकंच नव्हे व्हेंटिलेटर असल्याने धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना चिंता होती. पण धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय देओल कुटुंबाने घेतला. धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते उपचारातून बरे होताना दिसत आहेत. अशातच या सर्व चिंताजनक काळात धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे.
या सिनेमात झळकणार धर्मेंद्र
श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' सिनेमात धर्मेंद्र झळकणार आहेत. या सिनेमात शहीद मुलाच्या वडिलांची भूमिका ते साकारताना दिसणार आहेत. 'एका बापाने मुलाला वाढवलं, एका असामान्य व्यक्तिमत्वाने देशाला घडवले', असं कॅप्शन देत धर्मेंद्र यांचं हे पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. '२१ वर्षांच्या जवानाचे वडील साकारताना धर्मेंद्र जी', अशा शब्दात धर्मेंद्र यांच्या या भूमिकेची झलक चाहत्यांसमोर शेअर करण्यात आली आहे. मधल्या वाईट काळानंतर धर्मेंद्र यांना नव्या सिनेमातील पोस्टरवर पाहून चाहते भावुक झाले आहेत.
इक्कीस सिनेमाविषयी
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि 'बदलापूर', 'अंधाधून' यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत जयदीप अहलावत, धर्मेंद्र या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याचवर्षी २५ डिसेंबर २०२५ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मेंद्र यांचा दमदार अभिनय मोठ्या पडद्यावर बघण्यास चाहते खूप उत्सुक आहेत.