प्रभासच्या बहुचर्चित 'स्पिरिट'चा पहिला प्रोमो रिलीज; बॉबी देओलनंतर आता विवेक ओबेरॉयचं करिअर सेट करणार संदीप वांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:15 IST2025-10-24T10:45:58+5:302025-10-24T11:15:56+5:30
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित प्रभासच्या आगामी 'स्पिरिट' सिनेमाचा पहिला व्हिडीओ रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे अभिनेता प्रभास आणि विवेक ओबेरॉय सिनेमात एकत्र झळकणार आहेत

प्रभासच्या बहुचर्चित 'स्पिरिट'चा पहिला प्रोमो रिलीज; बॉबी देओलनंतर आता विवेक ओबेरॉयचं करिअर सेट करणार संदीप वांगा
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि 'कबीर सिंग', 'ॲनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'स्पिरिट' (Spirit) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ऑडिओ टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमुळे चाहत्यांमध्ये रिलीजआधीच सिनेमाविषयी क्रेझ निर्माण झाली आहे. टीझरमध्ये प्रभासच्या भूमिकेचा फक्त आवाज ऐकायला मिळतो.
प्रभासने सांगितली कॅरेक्टरची वाईट सवय
'स्पिरिट'च्या या ऑडिओ टीझरमध्ये फक्त प्रभासचा आवाज ऐकायला मिळतो, जो त्याच्या व्यक्तिरेखेची एक अत्यंत गंभीर वाईट सवय सांगताना दिसतो. प्रभास म्हणतो की, "माझी वाईट सवय ही आहे की... मला गोष्टींचं लगेच व्यसन लागतं. ते दारू असो, सिगारेट असो किंवा मुली. मी पटकन त्यांच्या आहारी जातो आणि तितक्याच लवकर त्यातून बाहेरही पडतो. पण यावेळेस समस्या ही आहे की, मला अशा गोष्टीचं व्यसन लागलं आहे, जे मी सोडू शकत नाही." आता प्रभासला नेमकं कसलं व्यसन लागलंय, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.
विवेक ओबेरॉयची खास भूमिका
या टीझरची उत्सुकता आणखी वाढली कारण प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय सिनेमात प्रभाससोबत झळकणार आहे. विवेक कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने 'ॲनिमल'च्या माध्यमातून बॉबी देओलच्या करिअरला जशी नवसंजीवनी दिली तसंच काहीसं विवेक ओबेरॉयच्या बाबतीत घडेल, अशी शक्यता आहे.
एकेकाळी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता असलेला विवेक सध्या मोजक्याच सिनेमात दिसतोय. त्यामुळे 'स्पिरिट'निमित्त विवेक काय कमाल करतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 'स्पिरिट' या सिनेमात प्रभास एका पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. चाहत्यांना आता 'स्पिरिट'च्या अधिकृत टीझरची प्रतीक्षा आहे. सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरीचीही खास भूमिका आहे.