पहिल्याच सिनेमात स्टारकिड्सने दिले लिपलॉक सीन्स, 'द आर्चीज' ला मिळतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:18 IST2023-12-08T15:17:51+5:302023-12-08T15:18:29+5:30
सध्या स्टारकिड्सच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे.

पहिल्याच सिनेमात स्टारकिड्सने दिले लिपलॉक सीन्स, 'द आर्चीज' ला मिळतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद
झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' (The Archies) नुकताच रिलीज झाला आहे. सुहाना खान (Suhana Khan), खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) या स्टारकिड्सने सिनेमातून पदार्पण केलं आहे. शाहरुखची लेक सुहानाने पदार्पणातच लिपलॉक सीन देत लक्ष वेधून घेतलंय. शिवाय श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचाही सिनेमात लिपलॉक सीन आहे. सध्या स्टारकिड्सच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे.
'द आर्चीज' सिनेमा लहानपणी वाचलेल्या कॉमिक्सवर आधारित आहे. १९६० च्या दशकातील सुंदर चित्रण या सिनेमात केलं आहे. तसंच तेव्हाच्या काळातील श्रीमंतांच्या घराण्यातील मुलांचं पात्र या स्टारकिड्सने उत्तमरित्या साकारलं आहे. त्यांची वेशभूषाही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. दरम्यान सिनेमात सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्यात लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहे. तसंच अगस्त्य नंदाचा दोघींसोबत लिपलॉक सीनही चर्चेत आहे. प्रेक्षकांना स्टारकिड्सचा हा बिंधास्त अंदाज पसंतीस पडलाय.
शाहरुख खानची लाडकी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांची केमिस्ट्री पडद्यावरही छान जुळून आली आहे. तर खुशी कपूरनेही पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकलंय.
'द आर्चीज' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात स्टारकिड्सशिवाय आदिती सहगल, युवराज मेंडा, मिहीर आहुजा आणि वेदांग रैना यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचा प्रिमियर मोठ्या उत्साहात पार पडला होता. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचं संपूर्ण कुटुंब प्रिमियरला हजर होतं.