बॉक्स ऑफिसवर आयुषमान खुरानाच्या 'थामा'चा जलवा, हॉरर-कॉमेडीला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, कलेक्शन किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:17 IST2025-10-24T11:13:06+5:302025-10-24T11:17:44+5:30
Thamma Box Office Collection: 'थामा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन दिवसांतच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

बॉक्स ऑफिसवर आयुषमान खुरानाच्या 'थामा'चा जलवा, हॉरर-कॉमेडीला मिळतेय प्रेक्षकांची पसंती, कलेक्शन किती?
Thamma Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर अभिनेता आयुषमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या 'थामा' या चित्रपटाचा जलवा पाहायला मिळतोय. दंतकथा आणि लोककथेची सांगड घालत दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने या चित्रपटातून प्रेक्षकांना वेताळांच्या विश्वाची सफर घडवली आहे. दरम्यान, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. २१ ऑक्टोबरच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत चांगली कमाई करत बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, थामाने पहिल्याच दिवशी २४ कोटी रुपयांची कमाई करत आपलं खातं ओपन केलं. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८.६ कोटींचा व्यवसाय केला. शिवाय थामाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी १२.५ कोटी कमावले. त्यामुळे चित्रपटाचं एकूण कलेक्शन ५५,१० कोटी इतकं झालं आहे. सध्या मॅडॉक फिल्म्सच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट चांगलं कलेक्शन झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत थामा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय. आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना, आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेला हा चित्रपटाला सिनेरसिकांची वाहवा मिळते आहे.
असं आहे कथानक...
थामा चित्रपटाची कहाणी आलोक नावाच्या पत्रकारावर आधारित आहे. जंगल सफरीवर गेल्यानंतर एक अस्वल त्याच्यावर हल्ला करतं. तिथे ताडाका नावाची तरुणी (रश्मिका मंदाना) येऊन त्याला वाचवते. त्यानंतर मग खऱ्या अर्थाने कथानकाला सुरुवात होते.