वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक घेतलं का? तमन्ना भाटियाने सोडलं मौन, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:58 IST2025-11-11T11:57:38+5:302025-11-11T11:58:49+5:30
तमन्ना भाटियाने वजन कमी करण्यासाठी कोणतं वेगळं औषध घेतलं का? या चर्चांवर मौन सोडलं आहे

वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक घेतलं का? तमन्ना भाटियाने सोडलं मौन, म्हणाली-
बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या 'वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन'मुळे चर्चेत आहे. अचानक वजन कमी झाल्यामुळे, सोशल मीडियावर अनेक युजर्सने तमन्नाने वजन कमी करण्यासाठी 'ओझेम्पिक' किंवा 'मौंजारो' औषधं वापरल्याचा आरोप केला होता. अखेर यावर तमन्ना भाटियाने मौन सोडलंय. काय म्हणाली तमन्ना?
या आरोपांवर 'हार्पर बाजार मीडियाशी बोलताना तमन्नाने अखेर मौन सोडलं. तमन्ना म्हणाली, "मी वयाच्या १५ व्या वर्षापासून कॅमेऱ्यासमोर काम करत आहे, त्यामुळे माझ्याकडे लपवण्यासाठी काहीही नाही. याआधीही मी अशीच सडपातळ होते. माझं शरीर नेहमीच असंच राहिलं आहे. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झाल्यास, हा बदल माझ्यासाठी नवीन नाहीये. मी अशीच मोठी झाली आहे आणि अशीच राहिली आहे."
तमन्ना भाटिया पुढे म्हणते, "हिंदी प्रेक्षकांसाठी ही गोष्ट नवीन असू शकते, पण मी जवळपास १०० चित्रपट केले आहेत आणि लोकांनी मला वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या शारीरिक बदलांमध्ये पाहिलं आहे. परंतु, बहुतेक चित्रपटांमध्ये मी सडपातळच राहिली आहे. लोकांना हे समजून घेण्याची गरज आहे की स्त्रियांचे शरीर बदलत राहते; दर पाच वर्षांनी आपल्याला स्वतःचे एक वेगळे रूप दिसते."
तमन्ना म्हणाली, "माझ्या बाबतीत सांगायचं तर, कोरोनाच्या काळात माझ्या शरीरात खूप बदल घडले. त्याकाळात माझ्यासाठी वजन नियंत्रित करणं कठीण झालं होतं. मी या काळात खूप संघर्ष केला. मला वरण, भात आणि चपाती खायला खूप आवडते. हे सर्व आरोग्यदायी पदार्थ खात असतानाही, मला कॅमेऱ्यासमोर जावं लागत होतं. पण नंतर मला कळलं की, मला विशिष्ट शारीरिक आकारात राहायचं नाहीये. कारण त्या काळात मला वाटू लागलं, 'माझं पोट बाहेर येत आहे का?' कारण एक वेळ अशी आली होती, जेव्हा माझं पोट बाहेर येऊ लागलं होतं आणि मी विचार करू लागले की माझ्या शरीराला काय होत आहे?" पण नंतर माझ्यातला हा बदल मी स्वीकारला.''